मालवण बस स्थानक जुन्या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला

महिला प्रवासी गंभीर जखमी ; एसटी अधिकारी कर्मचारी यांनी महिलेला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात केले दाखल

मालवण | प्रतिनिधी : मालवण बस स्थानकाच्या जुन्या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग महिला प्रवासाच्या डोक्यावर पडल्याची घटना बुधवारी घडली. यात प्रवासी महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काही वर्षांपूर्वी या इमारतीचा स्लॅब कोसळून एक प्रवासी जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. इमारतीच्या काही भागात सुरक्षा आच्छादने लावून सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र त्या बाजूला दुसऱ्या ठिकाणचा स्लॅब भाग कोसळला.

 

सद्यस्थितीत बस स्थानकाच्या नव्या इमारतीचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रवासी जुन्या इमारतीतच आपल्या बसची वाट पाहत बसतात. सकाळीच बेळगाव येथून मालवणात आलेले एक दांपत्य आचरा येथे असणाऱ्या आपल्या मुलाला भेटण्यासाठी जात होते. आचरा बस फेरीची वाट पाहत बसले असता अचानक स्लॅबचा काही भाग महिला प्रवाशाच्या डोक्यावर पडला. यात ती गंभीर जखमी झाली. जखमी महिलेला एसटीच्या अधिकारी कर्मचारी यांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. महिलेची प्रकृती स्थिर होती.