चिरणी-धनगरवाडीनंतर २१ दिवसात एकही अर्ज नाही

खेड(प्रतिनिधी)
तालुक्यातील चिरणी-धनगरवाडी येथील विहीर आटल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी दाहीदिशा सुरू आहे. ४ मार्च रोजी ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेत अर्ज देखील दाखल केला आहे. अजूनही ग्रामस्थ टँकरच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र या धनगरवाडीनंतर गेल्या २१ दिवसात एकाही गाव-वाडीतून टँकरच्या मागणीसाठी अर्ज प्रशासनाकडे दाखल झालेला नाही. यामुळे प्रशासनाला काहीअंशी दिलासाच मिळाला आहे.
रणरणत्या उन्हामुळे उपलब्ध पाण्याचे जलस्त्रोत आटत चालले आहेत. चिरणी-धनगरवाडी येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मात्र टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी अद्याप दाखला प्राप्त न झाल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.
तालुक्यातील सुसेरी-देवसडे येथील सावंतवाडी, कदवाडी, जाधववाडी, वैरागवाडी, बौद्धवाडी, मधलीवाडीसह दिवाणखवटी-सातपानेवाडी येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असून ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करत आहेत. मात्र २१ दिवसानंतरही पंचायत समितीच्या पाणी विभागाकडे अद्याप एकाही गाव-वाडीचा अर्ज प्राप्त झालेला नाही.