मालवण | प्रतिनिधी : साठ वर्षापूर्वी थोर व्यक्तीमत्वानी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या माध्यमातून मालवण भूमीत लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. हजारो विध्यार्थी यां महाविद्यालयाने घडवले. हे ज्ञानमंदिर आगामी काळातही अधिक नावलौकिक प्राप्त करत असताना महाविद्यालय प्रती माजी विद्यार्थ्यांचे योगदान बहुमोल असे राहील. असा विश्वास उद्योजक दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.
मालवण येथील कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचालित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय हीरक महोत्सव साजरा करत आहे. 2024-25 यां वर्षात विविध कार्यक्रम संपन्न होत असताना हीरक महोत्सव कार्यालयाचे उदघाटन सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव गणेश कुशे, सहसचिव शैलेश सामंत, प्राचार्य डॉ. एस. ए. ठाकुर, संस्था पदाधिकारी समीर गावाणकर, साईनाथ चव्हाण, शशिकांत झांटये, यांसह सुधीर धुरी, दयानंद चौधरी, नाईक-साटम तसेच प्राध्यापक व विध्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थी घडवत असलेल्या शिक्षणसंस्था, ज्ञानमंदिरे (शाळा) सक्षम झाल्या पाहिजेत. यासाठी आपले योगदान असलेच पाहिजे हे संस्कार खा. राणे साहेबांचे आहेत. त्या माध्यमातून आमचे खारीचे योगदान देण्याचा प्रयत्न असतो आणि यापुढेही राहील. त्यासोबत संस्था चालक, माजी विध्यार्थी व राजकीय मंडळी या सर्वांच्या योगदानातून ही शिक्षण संस्था हे महाविद्यालय जिल्ह्यातील आदर्श महाविद्यालय बनवूया. असे आवाहन दत्ता सामंत यांनी या निमित्ताने केले. आमदार निलेश राणे यांचेही मालवण कुडाळच्या गतिमान विकासासोबत येथील शैक्षणिक वाटचालीतही महत्वपूर्ण योगदान असल्याचा उल्लेख दत्ता सामंत यांनी आवर्जून केला.
यावेळी सचिव गणेश कुशे यांनी प्रास्ताविक करताना संस्था व महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा मांडला. कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब पंतवालावलकर यांनीही विचार मांडले. प्राध्यापक डॉ. सुमेधा नाईक यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले तर प्राध्यापक चौगुले यांनी आभार मानले.











