गोवा येथील एलईडी नौका मालवण समुद्रात पकडली

पुढील कारवाईसाठी नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात आणली : सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई

अमित खोत | मालवण : महाराष्ट्र जलधी क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर ११ सागरी मैल येथे अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईटव्दारे मासेमारी करणाऱ्या गोवा येथील एल.ई. डी. नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे. पुढील कारवाई सुरु आहे. अशी माहिती मत्स्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.

महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मत्स्य खात्याचा पदभार घेतल्या नंतर अवघ्या तीन महिन्यात अनधिकृत एलईडी लाईट नौकांनावर धडक कारवाईचा धडाकाच लावला आहे. गेल्या अनेक वर्षातील कारवाई पाहता गेल्या तीन महिन्यात रेकॉर्डब्रेक कारवाई मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात मत्स्य विभागाने केली आहे. सोबतच आमदार निलेश राणे यांनीही अनधिकृत एलईडी लाईट व पर राज्यातील हायस्पीड नौकांनावर धडक कारवाई बाबत विधीमंडळात आक्रमक भुमिका वेळोवेळी मंडली. तसेच मत्स्य अधिकारी वर्गालाली कठोर कारवाई बाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मत्स्य विभागाकडून कारवाईचा धडाका सुरु आहे.

रविवार ३० मार्च रोजी रात्री सिंधुदुर्ग मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी रविंद्र मालवणकर, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, दांडी मालवण हे समुद्रात नियमित गस्त घालत होते. यावेळी गोवा राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली नौका बलाका जेजू नों. क्र. आयएनडी जीए ५ एमएम २३५१ द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर ११ सागरी मैल येथे अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईट व्दारे मासेमारी करत असताना दिसून आली. सदर नौका मत्स्य विभागाने ताब्यात घेतली आहे. या नौकेवर नौका तांडेलसह ३० खलाशी होते.

सदर नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे. त्यावरील मासळीचा लिलाव करण्याची कार्यवाही सुरु होती. वागटी, सुरमई, बांगडा इत्यादी प्रकारचे मासे नौकेवर आहेत. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करून सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधदुर्ग कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. अंदाजे ६ ते ७ लाख रुपयांची लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत ही कारवाई करण्यात येत असून सदर नौकेस मोठा दंड होण्याची शक्यता आहे.

अंमलबजावणी अधिकारी रविंद्र मालवणकर, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, दांडी मालवण यांनी पोलिस कर्मचारी पाटोळे तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक मालवण यांचे सहकार्याने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली आहे. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांचे कोर्टात ठेवण्यात येणार असून पुढील कारवाई होणार आहेत.