खेड(प्रतिनिधी) खेड शहरातील जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसा प्रक्रिया अलोरे येथील जलसंपदा विभागामार्फत २ पोकलेनच्या सहाय्याने वेगाने सुरू आहे. या प्रक्रियेत ४ दिवसातच नाम फाऊंडेशनही सक्रिय होणार असून २ पोकलेनच्या सहाय्याने गाळ उपसा करण्यात येणार आहे. त्यांच्या मशिनरींना डिझेलचा पुरवठा केला जाणार असल्याचे समजते. पाऊस पडेपर्यंत नाम फाऊंडेशन गाळ उपसा प्रक्रियेत सक्रिय राहणार आहे.
४ मार्चपासून जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसण्यास सुरुवात झाली आहे. भरती-ओहोटीमुळे उपसलेला गाळ पुन्हा नदीपात्रात वाहून जात होता. यामुळे गाळ शेतकऱ्यांना वाहून नेण्याची मुभा देण्यात आली आहे. गेल्या २२ दिवसात ३ हजार घनमीटर गाळ उपसा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
गाळ उपशासाठी अलोरे येथील जलसंपदा विभागाच्या दिमतीला येत्या चार दिवसातच नाम फाऊंडेशनही येणार आहे. नाम फाऊंडेशनच्याही २ पोकलेन तैनात करण्यात येणार आहेत. या दोन्ही मशिनसाठी लागणाऱ्या डिझेलचा पुरवठा जलसंपदा विभागाकडून केला जाणार आहे. दोन्हींच्या यंत्रणांमुळे नदीपात्रातून जास्तीत जास्त गाळ उपसा केला जाणार आहे. पाऊस पडेपर्यंत ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.










