फ्लाय 91 या कंपनीच्या सिंधुदुर्ग पुणे विमान सेवेला प्रारंभ…
परुळे : प्रतिनिधी
अखेर दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर आज १ एप्रिल २०२५ पासून चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावरून पुन्हा विमान प्रवासी वाहतूक सुरू झाली. सकाळी सुरुवातीला फ्लाय 91 या कंपनीची सिंधुदुर्ग पुणे ही विमान सेवा सुरू झाली सकाळी ७.५० वाजता हे विमान पुणे येथून सुटले आणि ९.१० वाजता चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर पोहोचले. या विमानात १० प्रवाशांनी पुणे ते सिंधुदुर्ग प्रवास केला. तर सिंधुदुर्ग वरुण आज पहिल्या दिवशी ६ प्रवासी घेऊन विमान पुणे येथे निघाले.
आठवड्यातून पाच दिवस शुक्रवार आणि सोमवार वगळता ही विमान सेवा सुरू राहणारा आहे. गेले काही महिने सिंधुदुर्ग विमानतळावर आधी सुरू असलेल्या सर्व विमानसेवा एक एक करून कंपनीने काही तांत्रिक अडचणींमुळे बंद केल्याने प्रवास वाहतूक बंद होती. त्यामुळे प्रवाशांना त्यांचा फटका बसला. यानंतर या विषयावरून बरेच राजकारण रंगले आरोप प्रत्यारोप झाले. मात्र मा. खासदार नारायणराव राणे साहेब यांनी याविषयी विमानसेवा पुन्हा सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. नुकतेच त्यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चा करून अलायन्स एअर कंपनी ची सिंधुदुर्ग मुंबई विमान सेवा पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती दिली होती. त्याप्रमाणे एप्रिल महिन्यात मुंबई सेवा सुरू होईल असे संकेत आहेत. त्याआधी फ्लाय 91 कंपनी तर्फे सिंधुदुर्ग पुणे फेरी सुरू होत आहे अशी माहिती फ्लाय 91 चे सिंधुदुर्ग चे.व्यवस्थापक श्री. सैनि यांनी दिली. पाडव्याच्या शुभ प्रसंगी सिंधुदुर्ग विमानतळ पुन्हा टेक ऑफ घेईल अशी अपेक्षा आहे. त्याच बरोबर फ्लाय 91 कंपनी मुंबई सिंधुदुर्ग सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे, असेही त्यांनी सांगितले.












