दारू विक्रीप्रकरणी ६२ वर्षीय संशयितावर गुन्हा दाखल
सावंतवाडी । प्रतिनिधी :
माजगाव ख्रिश्चन वाडी परिसरात विनापरवाना गोवा बनावटीची दारू विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी मोठी कारवाई केली. या छाप्यात १८५० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून, एका ६२ वर्षीय संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजगाव ख्रिश्चन वाडी येथील रहिवासी लुईस आतोन देसा (वय ६२) हा आपल्या राहत्या घराच्या पाठीमागील उघड्या पडवीत गोवा बनावटीच्या दारूचा साठा करून तो विक्री करणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी, १५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक छापा टाकला.
या कारवाईदरम्यान संशयित आरोपीच्या ताब्यातून एकूण १८५० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू मिळून आली. सदर मद्यसाठा विनापरवाना आणि विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे बाळगल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी तो जप्त केला आहे. याप्रकरणी लुईस देसा याच्याविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
सदरची यशस्वी कारवाई सावंतवाडीचे पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार धुरी, जाधव, प्रकाश कदम आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (स्तागुशा) पथकाने केली आहे.
तालुक्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी आता अधिक कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून, या कारवाईमुळे अवैध मद्य विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.













