नेमळे रस्त्याचे खडीकरण गेले खड्ड्यात : डांबरीकरण प्रतीक्षेतच

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराकडून फसवणूक

ग्रामस्थांचा आरोप : आंदोलनाचा इशारा

सावंतवाडी । प्रतिनिधी : नेमळे ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदारावर गंभीर आरोप केले आहेत. नेमळे कौल कारखाना ते नेमळे तिठा या केवळ ६०० मीटर रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामात या दोघांनी मिळून ग्रामस्थांची घोर फसवणूक केली असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. पूर्णपणे डांबरीकरण मंजूर असताना ठेकेदाराने केवळ खडीकरण केल्याने वर्षभरातच रस्त्याची चाळण झाली आहे. यामुळे शाळकरी मुले आणि वाहनचालकांचे वारंवार अपघात होत असून या गंभीर बाबत त्वरित कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नेमळे ग्रामस्थांनी म्हटले आहे की, नेमळे गावातील कौल कारखाना ते नेमळे तिठा या रस्त्याचे डांबरीकरण मंजूर झाले होते. मात्र, ठेकेदाराने सुरुवातीला केवळ खडीकरणाचा एक टप्पा पूर्ण केला आणि त्यानंतर डांबरीकरण केलेच नाही. काही दिवसांतच हे खडीकरण उखडून गेल्याने वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी नेमळे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकवेळा पत्रव्यवहार केला, परंतु त्यांच्या मागणीला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर त्रस्त ग्रामस्थांनी २६ जानेवारी रोजी लेखी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता.

या इशाऱ्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांनी २५ जानेवारी रोजी सायंकाळी आंदोलनकर्त्या ग्रामस्थांची भेट घेतली. त्यांनी २६ जानेवारीचे आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली आणि येत्या २६ जानेवारीपासून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्याचे तसेच २५ फेब्रुवारीपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन नेमळे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना दिले. या आश्वासनामुळे ग्रामस्थांनी आपले नियोजित आंदोलन स्थगित केले.
परंतु, आज दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी डांबरीकरणाचे कोणतेही काम सुरू झालेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार आता एकमेकांकडे बोट दाखवून मूग गिळून बसले आहेत. यामुळे नेमळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

या केवळ ६०० मीटर डांबरीकरणासाठी शासनाकडून मंजूर झालेला निधी दोन वर्षे होऊन गेली तरी रस्त्याचे काम अपूर्णच आहे. यामुळे हा निधी नेमका कुठे गेला, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांनी ग्रामस्थांच्या डोळ्यात धूळफेक करून त्यांची फसवणूक केली आहे, असा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर तक्रार करून चौकशी लावण्याचा निर्धार नेमळे ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. रस्त्याचे काम तातडीने सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.