शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती : विविध कार्यक्रमांचे आयोजन
अमित खोत | मालवण : विकासाचे महामेरू महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे साहेब यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक उत्सव म्हणून साजरा करणार. १० एप्रिल रोजी प्रत्येक गावात, प्रत्येक विभागात एक आनंद सोहळा आणि एक आनंदाचा सोहळा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन शिवसेनेच्यावतीने करण्यात येणार आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली.
मालवण कुंभारमाठ येथील निवासस्थानी सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजा गांवकर, दिपक पाटकर, सुदेश आचरेकर, संतोष साटविलकर, मंदार लुडबे, राजू बिडये, भाऊ मोरजे, दादा नाईक, कमलेश कोचरेकर, आनंद खवणेकर, शिवसेना प्रवक्ते रत्नाकर जोशी तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
दत्ता सामंत म्हणाले,
राणे कुटुंबियांचे ग्रामदैवत असलेल्या कांदळगाव याठिकाणी 10 एप्रिल रोजी लघुरुद्र आणि महाप्रसाद होणार आहे. खासदार राणे यांच्या दिर्घायुष्यासाठी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तालुक्यातील प्रत्येक विभागात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
1990 साली राणे साहेब आमदार झाल्यापासून मालवण तालुक्याच्या सर्वांगिण विकासाबरोबरच जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशिल राहिले. त्यांनी राज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हयाचे नाव उंचावले. सिंधुदुर्ग जिल्हा पहिला पर्यटन जिल्हा म्हणून श्री. राणे यांच्याचमुळे जाहीर झाला. जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी महत्वपूर्ण अशी कामे झाली आहेत. ठिकठिकाणी निर्माण झालेल्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांमुळे किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या घरांना आधार निर्माण झाला. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी लक्षवेधी कामगिरी केली. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये विकासनिधीची गंगाच वाहिली होती. गावागावात रस्ते, विज, शाळा आणि पायाभुत सुविधा निर्माण झाल्या होत्या. यामुळे राणेंच्या प्रति सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेहमीच आदराची भावना आहे, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्गातून प्रचंड मताधिक्य घेत विजय संपादन केला. लोकसभा जिंकल्यानंतर सिंधुदुर्गातील कणकवली मतदार संघातून नितेश राणे आणि मालवण मतदार संघातून निलेश राणे हे आमदार म्हणूनही विजयी झाले. यामुळे सिंधुदुर्गवासियांचे प्रचंड प्रेम राणे कुटुंबियांवर आहे. अशाप्रकारे एक खासदार आणि दोन आमदार असणारे एकमेक कुटुंब आहे. त्यांचा वाढदिवस आमच्यासाठी एक प्रेरणास्थान असाच आहे. हा वाढदिवस न भुतो न भविष्यती अशाच पद्धतीने जिल्हयात साजरा होणार आहे, असेही श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.












