वेंगुर्ले तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची ८ एप्रिल रोजी सोडत

 

वेंगुर्ले | प्रतिनिधी :वेंगुर्ले तालुक्यातील एकूण ३० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत येत्या ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय वेंगुर्ले येथे होणार आहे. सन २०२५ ते २०३० या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका विचारात घेऊन हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली.
वेंगुर्ले तालुक्यात एकूण ३० ग्रामपंचायती असून, यापैकी अनुसूचित जातीकरिता १ ग्रामपंचायत, नागरिकांचा मागास प्रवर्ग ४ ग्रामपंचायत आणि महिला प्रवर्ग ४ ग्रामपंचायत, खुल्या प्रवर्ग १० ग्रामपंचायत व खुला प्रवर्ग महिला ११ ग्रामपंचायत आरक्षित असणार आहेत. एकूणच आरक्षणाची स्पष्टता झाल्यानंतर सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्यांची मोर्चेबांधणी सुरू होणार आहे. त्यामुळे या सोडतीकडे अनेक इच्छुकांनी लक्ष केंद्रित केले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आरक्षण सोडतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे