कणकवली | मिलिंद पारकर : संस्कृत भारती जिल्हा सिंधुदुर्ग आणि विद्यानिकेतन कॉन्व्हेन्ट स्कूल कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हासंमेलन ‘गीताधारा’ विद्यानिकेतन कॉन्व्हेन्ट स्कूल कसाल येथे संपन्न झाले. आरंभी संस्कृत क्रीडा सत्र, नृत्य, नाट्य, पोवाडा असे सांस्कृतिक कार्यक्रम संस्कृतमधून सादर झाले. दीपप्रज्वलनानंतर संस्कृतभारती सिन्धुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. रघुनाथ शेवडे यांनी प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय करून दिला. श्री. मनोहर काजरेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्कृत भारतीच्या कार्यांचे वृत्तकथन केले.
संस्कृत भारतीचे कोंकण प्रांत शिक्षण प्रमुख श्री. आशिष आठवले यांनी संस्कृतभारतीच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन शिवछत्रपतींच्या ३५०व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त छ. शिवरायांचे गुण आणि कार्य यांच्या आठवणींना उजाळा दिला. कनेडी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी भगवद्गीतेच्या १२व्या अध्यायाचे सादरीकरण केले. त्यानंतर मुख्य अतिथि वेदमूर्ती श्री. सचिन भाटवडेकर यांनी जीवनातील भगवद्गीतेचे महत्व विशद केले. ‘गीतेचे पुस्तक प्रत्येकाने आपल्या खिशात ठेवावे . कधीतरी ते उघडून पाहण्याची इच्छा होईल आणि जीवनभर कोणत्याही समस्येचे उत्तर गीतेत सापडेल.’ आपल्या ओघवत्या शैलीत गीतामाहात्म्य स्पष्ट केले.
शांतिमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी चिराग बांदेकर, युरेका सायन्स क्लब प्रमुख सुषमा केणी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. युक्ता मेस्त्री, संस्कृतभारती जिल्हाध्यक्ष श्री. शेवडे सर, कोंकण प्रांत शिक्षण प्रमुख श्री.आशिष आठवले, कोंकण प्रांत विद्वत्परिषद संयोजक श्री. महाबलभट उपस्थित होते. कार्यक्रमाला ७२ जण उपस्थित होते. आभार प्रदर्शन श्री. भास्कर साधले यांनी केले. सूत्रसंचालन सौ.मैथिली महेंद्र पिळणकर आणि सौ. अनन्या वाटवे यांनी केले.










