भरणेत भररस्त्यात बंद पडली एसटी

खेड(प्रतिनिधी)

मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे-शिंदेवाडीनजीक शनिवारी सायंकाळच्या सुमारास भररस्त्यातच बंद पडलेल्या एसटीमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मागून पर्यायी एसटी बस येईपर्यंत प्रवाशांना तिष्ठत उभे राहावे लागले. बस फेऱ्यांमध्ये पुन्हा तांत्रिक बिघाडाचे सत्र सुरू झाल्याने प्रवाशांना आर्थिक फटकाही बसत आहे.

एसटी (एम.एच. २० बी.एल. ३३८३) महामार्गावरून खेडच्या दिशेने येत होती. ही बस अचानक भरणे-शिंदेवाडीनजीक बंद पडली. बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले.

बसफेरीतील बिघाडाबाबत येथील आगारातील कार्यशाळेत संपर्क साधण्यात आला. यानंतर यांत्रिकी विभागातील कर्मचारी बस फेरीतील बिघाड दूर करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. मात्र एसटीच्या प्रतीक्षेत असलेल्या काही प्रवाशांनी खासगी वाहनांचा आधार घेत इच्छितस्थळ गाठले. बस नेमकी कोणत्या आगाराची होती, हे समजू शकले नाही