यावर्षी ११६.४८ कोटी ढोबळ नफ्यासह आर्थिक भरारी २३५ जागा रिक्त त्यातील ८६ कर्मचारी पद भरतीचा मार्ग मोकळा.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी
सिंधुनगरी : बाळ खडपकर
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३१मार्च रोजी संपलेल्या या आर्थिक वर्षात तब्बल ७०३.८६ कोटीची भरीव वाढ केली असून बँकेचा एकूण व्यवसाय ६०९४.७५ कोटीपर्यंत गेला आहे. या वर्षात निव्वळ नफाही ९ कोटी ने वाढला असून यावर्षी तो ३५ कोटी झाला आहे. जिल्हा बँकेची ही आर्थिक गगन भरारी ऐतिहासिक असून आर्थिक व्यवहारातही ही बँक सर्वोत्कृष्ट ठरली आहे. बँकेच्या ठेवींचा दरही वाढलेला असून तो १२.१२ आहे,मात्र मुंबईसह कोकण विभागातील अन्य बँकांचा हा दर आठ टक्के च्या खाली आहे अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली. तर या जिल्हा बँकत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या २३५ जागा रिक्त असून त्यातील ८६ पद भरण्यास मुख्यमंत्री मंजुरी मिळाली आहे. कंपनीमार्फत ही पदे लवकर भरली जातील असेही ते म्हणाले.
३१ मार्च आर्थिक वर्ष संपल्यानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी बँकेची वर्षभरातील आर्थिक स्थितीबाबत केलेली घोडदौड व बँकेच्या ठेवीसह नफ्यातही केलेल्या विक्रमी वाढीची माहिती या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी दिलीप रावराणे, आत्माराम ओठवणेकर, प्रकाश मौर्ये, रवी मडगावकर, गणपत देसाई, प्रज्ञा ढवन जिल्हा बँकेचे सीईओ प्रमोद गावडे अन्य अधिकारी उपस्थित होते.
बँकेच्या ठेवी, बँकेचा नफा एकूण व्यवसाय गुंतवणूक, थकीत कर्जे एनपीए प्रमाण व व्यवस्थापन खर्च या सर्वच आर्थिक मापदंडामध्ये या बँकेचे काम अन्य बँकांच्या तुलनेत आदर्श आहे नाबार्डने ऑडिटच्या दर्जातही ए दर्जा दिला आहे. यापूर्वी व्यवस्थापन खर्च दोन टक्के च्या वर जात होता त्यामुळे कर्मचारी भरती प्रक्रिया रखडली होती. हा खर्चही यावर्षी 1.85 टक्केवार आणून कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा बँकेने डिजिटल बँकिंग व अन्य डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून ग्रामीण भागापर्यंत ग्राहकांना चांगल्या व गतिमान सेवा पुरविल्या आहेत. अनेक व्यवसायांना उभारी देण्यासाठी कर्ज योजना राबविल्या आहेत. महिला व तरुण उद्योजक यांना प्रोत्साहन दिले आहे. अनेक घरकुले व दुधाळ जनावर योजना बँकेने अर्थसाह्य करत दुग्ध विकासाला गती दिली आहे. जिल्ह्यातील कृषी पशुसंवर्धन मासेमारी पर्यटन या प्रमुख अंगना चालना देण्यासाठी राज्याचे मंत्री तथा या बँकेच्या संचालक नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या बँकेने अनेक योजना आणल्या असून जनतेच्या दरडोई उत्पन्नाच्या वाढीसाठी भरीव काम केल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची उलाढाल यावर्षी ६०९४.७५ कोटी पर्यंत पोहचली असून या जिल्हा बँकेने आपल्या आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावत नेला आहे. ३१मार्च रोजी संपलेल्या वर्षात ठेवी मध्ये ३६०.३३ कोटींची वाढ, कर्जामध्ये ३४३.५३ कोटींची वाढ तर तब्बल ७०३.८६कोटीची व्यवसायातील वाढ केली आहे. या बँकेने ११६.४८ कोटी ढोबळ नफा मिळवत सिंधुदुर्ग जिल्हा बँक आपली बँक म्हणून जिल्हा वासीय ग्राहकांच्या मनात विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. व या जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक उद्योजक व व्यावसायिक निर्माण झाले अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी याने ओरोस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मार्च अखेर वर्ष पूर्तीनंतर गेल्या तीन वर्षाच्या काम केल्यानंतर जिल्हा बँकेने केलेल्या ऐतिहासिक कामाची व वाढवलेल्या व्यवसायाची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी यानिमित्ताने दिली. केंद्रीय मंत्री नारायण राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हा बँकेचे तज्ञ संचालक आमदार नितेश राणे ,आमदार निलेश गाणे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली बँकेचे अधिकारी कर्मचारी व बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळाने या दोन वर्षात केलेले काम व वाढविलेला व्यवसाय ऐतिहासिक ठरेल असाच आहे असेही त्यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बँक असून, या बँकेच्या जिल्हयामध्ये ९८ शाखा कार्यरत आहेत. बँकेमार्फत नियमित बँकिंग सेवांसह RTGS/NEFT, ATM, Mobile App, IMPS, UPI, E-com, QR-Code, ABPS, BBPS, Micro ATM. CTS, E-mail Account Statement इत्यादी आधुनिक बँकिंग सुविधा पुरविण्यात येत आहेत. जिल्हा बँकेने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षअखेर बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावताना ठेवी, कर्जे, एकूण व्यवसाय, स्वनिधी, कर्जवसुली, ढोबळ व निव्वळ नफा इत्यादीमध्ये लक्षणीय प्रगती केलेली आहे.
कोणत्याही वित्तीय संस्थेच्या यशस्वीततेचे मोजमाप हे त्या संस्थेच्या विविध आर्थिक मापदंडावरून निश्चित होत असते. दि.३१ मार्च, २०२५ अखेरील खालील आकडेवारीवरून बँकेच्या आर्थिक प्रगतीचा चढता आलेख निदर्शनास येत आहे.
या बँकेला यावर्षी ११६.४८ कोटी ढोबळ नफा
बँकेच्या इतिहासात दुस-यांदा रू.१०० कोटीच्यावर बँकेचा ढोबळ नफा गेलेला आहे. मागील दि.३१ मार्च, २०२४ अखेर बँकेचा ढोबळ नफा रू.१००.५९ कोटी एवढा होता. त्यामध्ये रू.१५.८९ कोटीने वाढ होवून दि. ३१ मार्च २०२५अखेर बँकेचा ढोबळ नफा रू.११६.४८ कोटी एवढा झालेला आहे. तर बँकेचा निव्वळ नफा दि.३१/०३/२०२४ अखेर रू.२६.००कोटी होता. त्यामध्ये रू.९.००कोटीने भरीव वाढ होवून दि.३१/०३/२०२५अखेर बँकेचा निव्वळ नफा रू.३५.०० कोटी एवढा झाला आहे.
दि.३१/०३/२०२४ अखेर बँकेच्या एकूण ठेवी रू.२९७२.७९ कोटी होत्या. त्यामध्ये रू. ३६०.३३कोटीने वाढ होवून दि.३१/०३/२०२५ अखेर एकूण ठेवी रू.३३३३.१२ कोटी एवढ्या झालेल्या आहेत. बँकिंग व्यवस्थेमध्ये ठेवीमधील १०.००% वाढहि चांगली मानणेत येत्.याही पुढे जाऊन बँकेने ठेव वाढीचे प्रमाण १२.१२% एवढे राखले आहे दि.३१ मार्च, २०२४ अखेर बँकेचा एकूण कर्जव्यवहार रू.२४१८.१० कोटी होता त्यामध्ये रू.३४३.५३कोटीने वाढ होवून दि.३१ मार्च, २०२५ अखेर एकूण कर्जव्यवहार रू.२७६१.६३ कोटी एवढा झाला आहे.
बँकेचा एकूण व्यवसाय मार्च २०२४अखेर रू.५३९०.८९कोटी होता. बँकेने माहे डिसेंबर २०२४ अखेर रू.६००० कोटींचा टप्पा गाठलेला होता. गतवर्षीशी तुलना करता, बँकेच्या एकूण व्यवसायामध्ये रू.७०३.८६ कोटीची भरीव वाढ होवून मार्च २०२५अखेर बँकेचा एकूण व्यवसाय रू.६०९४.७५ कोटी एवढा झालेला आहे. सदर व्यवसाय चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये रू.८००० कोटीच्यावर नेण्याचे बँकेचे उद्दिष्ट आहे.
कोणत्याही संस्थेचे स्वनिधी हे त्या संस्थेचा आर्थिक पाया असतो. स्वनिधीमध्ये बँकेचे भागभांडवल व नफ्यामधून वेळोवेळी उभारलेल्या राखीव व इतर निधींचा समावेश असतो. बँकेने स्वनिधी वाढीसाठी नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. दि.३१ मार्च, २०२५ अखेर बँकेच्या भागभांडवलामध्ये रू.३.१४ कोटी तर राखीव व इतर निधीमध्ये रू.८८.९५ कोटीने वाढ झाली असून बँकेच्या स्वनिधीमध्ये एकूण रू.९२.०९ कोटीने वाढ होवून दि. ३१ मार्च, २०२५ अखेर बँकेचे एकूण स्वनिधी रू.५७६.४५ कोटी एवढे झाले आहेत. बँकेचे खेळते भांडवल दि.३१ मार्च २०२४अखेर रू.३७३५.९६ कोटी एवढे होते त्यामध्ये रुपये ४३४.३५ कोटी एवढी वाढ होऊन दिनांक३१ मार्च २०२५रोजी बँकेचे खेळते भाग भांडवल रुपये ४१७०.३१ एवढे झाले आहे












