भुते नाका येथे पोलीस असल्याची बतावणी करत दोघांनी कानातले, साखळ्या चोरल्या
रत्नागिरीत जमावाकडून होणारी मारहाण, अमली पदार्थांचे साठे आणि आता भर दिवसा चोरी; पोलीस नेमके करतायेत काय ?
रत्नागिरी | प्रतिनिधी
शहरातील 80 फूटी हायवे येथे वृध्देला पोलिस असल्याची बतावणी करत तिच्या कानातील 14 ग्रॅम वजनाचे सोन्याचे 60 हजार रुपये किमतीचे कानातले व साखळ्या दोन अज्ञातांनी लांबवल्या.ही घटना मंगळवार 8 एप्रिल रोजी दुपारी 2.15 वा.सुमारास घडली. रत्नागिरी शहरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ सापडत आहेत, जमाव एकत्र येऊन निष्पापांना मारहाण करत आहे, त्याचवेळी आता चोरांचेही चांगलेच फावले असून शहर पोलीस नेमके करतात काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
रशिदा रशिद साखरकर (70, मुळ रा. राजापूर नाणार इंगलवाडी सध्या रा.पेठकिल्ला,रत्नागिरी) असे तक्रारदार वृध्द महिलेचे नाव आहे. मंगळवारी दुपारी रशिदा साखकर या पेठकिल्ला येथील आपल्या घरातून मांडवी येथे आपल्या नातेवाईकांकडे औषध आणण्यासाठी जात होत्या. त्या 80 फूटी आयवे येथील भूते नाक्याजवळ आल्या असता दोन अज्ञात पांढर्या रंगाच्या दुचाकीवरुन तिथे आले. त्यांनी रशिदा साखरकर यांना आपण पोलिस असल्याची बतावणी करत पुढे चोरी झाली आहे. एका तरुणाच्या गळ्यातील चेन चोरीला गेली असल्यामुळे तुम्ही तुमच्या अंगावरील दागिने काढून आमच्याकडील कागदामध्ये टाका असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून साखरकर यांनी आपल्या अंगावरील खोट्या दागिन्यांसह सोन्याचे खरे दागिनेही त्या कागदामध्ये ठेवले. त्यानंतर संशयितांनी हातचलाखी करत दुसर्याच कागदाची पुडी त्यांच्या हातात देउन तेथून पोबारा केला.
दरम्यान, रशिदा साखरकर यांनी घरी गेल्यानंतर ती पुडी उघडून पाहिली असता त्यांना त्यामध्ये प्लास्टिकच्या बांगड्या आणि दगड दिसून आले. आपली फसवण्ाूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आपल्या मुलाला फोन करुन सर्व हकिकत सांगितली. त्याने आईसह शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटिव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये अनेक अनुचित प्रकार घडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मिरकरवाडा येथे जमावाकडून भर दिवसा चौघांना मारहाण करण्यात आली होती, सतत तीन दिवस शहरातून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ आणि त्याची विक्री करणारे संशयित पकडले जात आहेत आणि आता भर दिवसा भर वस्तीत एका वृद्धेचे दागिने चोरले जात असतील तर शहर पोलीस नेमके काय करत आहे असा सवाल आता सामान्य जनता करत आहे.











