खेडमध्ये अखेर धावला पाण्याचा पहिला टँकर

खेड(प्रतिनिधी)
तालुक्यातील पहिला टँकर अखेर सोमवारी घेरारसाळगड-बुथराईवाडी येथे धावला. काही कारणास्तव ६ दिवसांपासून लांबणीवर पडलेली टैंकरने पाणीपुरवठा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने अखेर ग्रामस्थांना दिलासा मिळाला. यापाठोपाठ दोन-तीन दिवसातच खवटी-खालची धनगरवाडी येथेही टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अजूनही चार वाड्यांतील ग्रामस्थ टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.
रणरणत्या उन्हामुळे आटलेल्या जलस्त्रोतांमुळे घेरारसाळगड-बुथराईवाडीतील ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करण्याकरिता प्रशासनाकडून दाखलाही प्राप्त झाला होता. यासाठी ग्रामस्थांना ६ दिवस प्रतीक्षा करावी लागली. अखेर पंचायत समितीच्या पाणी विभागाने सोमवारी घेरारसाळगड -बुधराईवाडीतील ग्रामस्थांसाठी पाण्याचा पहिला टँकर पाठवला. चिरणी-धनगरवाडी, वावेतर्फे ढेबेवाडी, खवटी-खालची धनगरवाडी येथील ग्रामस्थही अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत आहेत. शासनदरबारी टँकरच्या पाण्यासाठी खेटे घालूनही पदरी निराशा पडत आहे.