मुंबई : मागील काही काळापासून अनैतिक संबंधाच्या संशयातून हत्या करण्याचे प्रकार राज्यासह देशात वाढताना दिसत आहेत. दोन महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून दोन तरुणांनी एकाची गोळ्या घालून हत्या केली होती.
पश्चिम बंगाल पोलिसांनी या हत्येप्रकरणी एका आरोपीला अटक केली होती. मात्र दुसरा आरोपी फरार होता. त्याला मानपाडा पोलिसांनी डोंबिवली येथून अटक केली असून पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. महत्त्वाचे म्हणजे आरोपी डोंबिवलीतील एका कंपनीत मजूर म्हणून काम असल्याची माहिती समोर येत आहे. (Accused of murder over immoral relationship in West Bengal arrested from Dombivli after two months)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिराज शाह असे आरोपीचे नाव असून तो डोंबिवली एमआयडीसीमध्ये मजूर म्हणून काम करत होता. त्याने आपल्या साथीदारासह फेब्रुवारी महिन्यात हुगळी येथील डंकुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंटी साव या व्यक्तीची अनैतिक संबंधाच्या संशयातून गोळ्या घालून हत्या केली होती. या हत्येतील मुख्य आरोपी अनिल साव याला पोलिसांनी तत्काळ अटक केली होती. मात्र या हत्येत सहभागी असलेला दुसरा आरोपी सिराज शाह हा फरार झाला होता. मागील दोन महिन्यांपासून पश्चिम बंगाल पोलीस त्याच्या मागावर होते.
डंकुनी पोलिसांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे सिराज शाहचा ठावठिकाणा हाती लागला. यानंतर डंकुनी पोलिसांनी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय कादबाने यांना सिराज शाहची माहिती दिली. त्यामुळे सिराज शाहला शोधण्यासाठी कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहिम सुरू झाली. अखेर मानपाडा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी महेश राळेभात यांच्या पथकाला डोंबिवलीतील एमआयडीसीत पश्चिम बंगालचा एक व्यक्ती मजूर म्हणऊन गेल्या दोन महिन्यापासून काम करत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी त्या मजूराला चौकशीला ताब्यात घेतले असता तो दुसरा कोणी नसून हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी सिराज शाह अशल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे मानपाडा पोलिसांनी सिराज शाहाला अटक करून त्याला पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात दिले.












