जिल्हा परिषद बांधकाम विभाग मात्र अनभिज्ञ, ग्रामपंचायतीची तक्रार
संतोष कोत्रे l लांजा -: तालुक्यातील आंजणारी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सुमारे सहा लाख रुपये किमतीचे तीन लोखंडी साखर हे चोरीला गेले आहेत.मात्र याबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभाग मात्र अनभिज्ञ असून याप्रकरणी आंजणारी ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने याविषयी जिल्हा परिषद बांधकाम विभाग लांजा यांना साकव चोरीला गेल्याचे पत्र सादर केले आहे .
दरम्यान ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील
तीन लोखंडी साकव चोरीला जात असल्याने ग्रामस्थांतून देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे. साकव चोरून कोणी नेले? यामध्ये कोणी स्थानिकांचा सहभाग आहे किंवा बाहेरील व्यक्तीचा ? हे प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आले आहेत.
लांजा तालुक्यातील आंजनारी ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील मौजे नांदिवली ,आंजनारी जोशीवाडी आणि पाष्टेवाडी येथील तीन लोखंडी साकव चोरीला गेले आहेत. या लोखंडी साकवांचा वापर देखील स्थानिक ग्रामस्थांना पावसाळ्यात वहाळाच्या पलीकडे ये-जा करण्यासाठी होत होता .मात्र असे असतानाही लोखंडी साकव चोरीला गेल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग मात्र या चोरीला गेलेल्या लोखंडी साकवाबाबत अनभिज्ञ असून या प्रकरणी कोणतीही माहिती ग्रामपंचायतीला प्राप्त नसल्याने आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही व्हावी अशा मागणीचे निवेदन आंजणारी ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच आणि ग्रामसेवक यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग लांजा यांना सादर केले आहे
दरम्यान हे लोखंडी साकव चोरीला गेलेच कसे? गावाबाहेरील कोणी भंगारवाला जर अशा प्रकारे गावात येऊन लोखंडी साकव चोरून घेऊन जात असेल तर ही गंभीर बाब असून त्याला कोणी सहकार्य केले? हे प्रश्न देखील निर्माण झाले आहेत. याबाबत जि.प.बांधकाम विभाग कोणती भूमिका घेणार हे आगामी काळात दिसून येणार आहे. तुर्तास सध्या तरी या साकव चोरीची जोरदार चर्चा गावात सुरू आहे.
______________________________________










