रामपूर एसटी निवारा शेडची दयनीय अवस्था

 जीव मुठीत घेऊन प्रवाशांचा निवाराशेडमध्ये वावर
चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण-गुहागर महामार्गावर रामपूर निवाराशेडची अवस्था दयनीय झाली असून गेल्या दोन वर्षापासून मोडकळीस आलेल्या निवाराशेडच्या छताचे सिमेंट पत्रे तुटून पडले आहेत. शेडच्या दर्शनीय भागात असलेल्या दगडी खांब ढासळून पडण्याच्या अवस्थेत आहेत. इमारतीचे बांधकाम जीर्ण व वाईट अवस्थेत आहेत. शिल्लक राहिलेल्या छतावर गवत रुजलेले आहे. खिडकी देखील मोडकळीस आलेली आहे. तात्काळ शेडची दुरुस्ती करावी, असे निवेदन कोकण प्रवासी महासंघ यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरी यांना दिले आहे.
या निवेदनात असे नमूद केले आहे की, रामपूर निवारा शेड येथे प्रतिदिन चारशे ते पाचशे एसटी प्रवासी प्रवास करत असतात. आता पाऊस सुरू आहे. तसेच कडाक्याचे ऊनही आहे. त्यामुळे नाईलाजाणे प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन निवारा शेडमध्ये थांबावे लागत आहे. या निवारा शेड येथून अनेक गावाला जोडणारे एसटी ये-जा करीत असतात. त्यामुळे विद्यार्थी, वयोवृद्ध, अपंग या निवारा शेडचा वापर करतात. गेल्या दोन वर्षापासून या गोष्टीकडे कोकण प्रवासी महासंघ विभाग नियंत्रक रत्नागिरी व बांधकाम विभाग रत्नागिरी यांना निवेदनद्वारे परिस्थितीची जाणीव करून देत आहेत. रामपूर निवारा शेड हे मृत्यूचा सापळा बनला आहे. तरी तात्काळ या निवेदनाचा विचार करावा अन्यथा नाइलाजाने प्रवाशांना रस्त्यावर उतरावे लागेल असेही या निवेदन नमूद केले आहे. या निवेदनावर महासचिव संस्थापक वसंत भोसले, अध्यक्ष गणेश चव्हाण,उपाध्यक्ष दीपक शिरकर, कार्याध्यक्ष अनिल कुमार जोशी, खजिनदार अविनाश चव्हाण, चिपळूण संपर्क दिलीप चव्हाण, गुहागर संपर्क दत्ताराम जाधव, सल्लागार मनोहर साळवी, सत्यवान महापुस्कर यांनी स्वाक्षरी केले आहे.