सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान सोहळा
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्याने या जिल्ह्याला आणि संपूर्ण कोकणाला नेहमीच दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. या तालुक्याला निर्भीड पत्रकारितेचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे. यापुढेही जिल्ह्याच्या गतिमान विकासासाठी पत्रकारांनी वेळोवेळी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आयोजित आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण व सन्मान सोहळ्याचे उद्घाटक तथा प्रमुख अतिथी म्हणून संबोधित करताना त्यांनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव केला.
ते म्हणाले, स्वर्गीय जयानंद मठकर, कै. बाप्पा धारणकर, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर तसेच गजानन नाईक यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांनी मोठ्या संघर्षातून पत्रकारितेचे व्रत जपले आणि त्यांचे कार्य आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरले आहे. त्यांच्या या पत्रकारितेचा वसा व वारसा आजची पिढी देखील जपत आहे याचे निश्चितच कौतुक व अभिमान आहे, असेही ते म्हणाले.
जिल्ह्याचा हा दक्षिणेकडील भाग लवकरच मोठ्या प्रमाणात विकासाकडे वाटचाल करत आहे. विकासाच्या या वाटचालीत आपल्यासारख्या पत्रकारांच्या मौलिक मार्गदर्शनाची गरज आहे. पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून लवकरच हा जिल्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) युक्त करण्यात येणार असून पत्रकारांनीही नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
डिजिटल माध्यमांच्या वाढत्या महत्त्वावर प्रकाश टाकताना दळवी म्हणाले की, आज पत्रकारिता अधिक वेगवान झाली आहे, त्यामुळे पत्रकारांसमोर नवीन आव्हाने उभी राहिली आहेत. त्यांनी राजकीय आणि सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्यासारख्या तरुणांना मार्गदर्शन करण्याची आणि योग्य दिशा देण्याची गरज आहे. पत्रकारांनी या दृष्टीनेही मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर भोसले नॉलेज सिटीच्या चेअरमन ॲड. अस्मिता सावंत -भोसले, सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ,जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ, जेष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, अभिमन्यू लोंढे, उद्योजक निरज देसाई, डिजीटल मिडीया जिल्हाध्यक्ष अमोल टेमकर, ॲड. अनिल निरवडेकर, निळकंठ मुंडेकर, उमा मुंडेकर, संध्या कोरगांवकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सचिव मयूर चराठकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वैनतेयकार मे.द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार नागेश पाटील, कै. जयानंद मठकर पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अवधूत पोईपकर, कै. पांडुरंग स्वार स्मृती जीवनगौरव पुरस्कार महादेव परांजपे, नाट्यकर्मी कै. बाप्पा धारणकर स्मृती अष्टपैलू पुरस्कार प्रवीण परब, आदर्श समाजसेवक कै चंदू वाडीकर स्मृती पुरस्कार विश्वनाथ नाईक, ज्येष्ठ छायाचित्रकार कै. मुरलीधर तथा बंडोपंत भिसे स्मरणार्थ छायाचित्रकार पुरस्कार अजित दळवी यांना प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, ॲड. अस्मिता सावंत भोसले, ॲड. अनिल निरवडेकर, डॉ. पांडुरंग वज्राटकर, डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवाळे, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, गजानन नाईक यांनीही शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा तालुका पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांनाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दीपक गावकर, काका भिसे, ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव, राजू तावडे, हर्षवर्धन धारणकर, सचिन रेडकर, जतीन भिसे, निलेश परब, मंगल कामत, मंगल नाईक, अनुजा कुडतरकर, ओंकार तुळसुलकर, रूपेश पाटील, साबाजी परब, उमेश सावंत, ॲड. अनिल निरवडेकर, रमेश बोंद्रे, अजित दळवी, नीलकंठ कुपेकर, उमा कुपेकर, आशितोष भांगले, नीरज देसाई, निलेश मोरजकर, शैलेश मयेकर, खुशी रेडकर, प्रणाली सावंत, तारक पिळणकर आदी उपस्थित होते.
आपल्या ओघवत्या व खुमासदार शैलीत गौरी बांदेकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. स्वागत तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार तर आभार मंगल नाईक यांनी मानले.












