पाली । वार्ताहर :मुंबई – गोवा महामार्गाचे चौपदरीकरणासाठी सपाटीकरणाची व उड्डाणपूल उभारणीची प्रक्रिया ही गेल्या काही वर्षापासून पाली बाजारपेठ या भागात प्रस्तावित महामार्गालगत सुरु करण्यात आली आहे. मात्र त्यावेळी तेथून असणारी पुर्वीची पाली ग्रा.पं. शासकीय नळपाणी योजनेची पाईपलाईन प्रथमत: अन्यत्र हलविणे गरजेचे होते परंतू त्याच्यावरच भराव टाकून काम करण्यात आल्याने ती अनेक ठिकाणी कायमच फुटत असते परंतु त्याच्यावर तात्पुरती दुरुस्ती करण्यात येत आहे. परंतू आता ऐन उन्हाळ्याच्या भीषण पाणीटंचाई मध्ये ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे काम करताना पाईपलाईन फुटल्याने गेले चार दिवस पाली बाजारपेठेचा पाणीपुरवठा पूर्णता बंद झालेला आहे.
बाजारपेठेत तर अनेकदा या अर्धवट केलेल्या सपाटीकरणावरून वाहने गेल्याने ती तुटून पाण्याचा अपव्यय होऊन पाणीपुरवठा बंद राहत आहे. शिवाय मोठा भराव असल्याने तो बाजुला करून दुरुस्त करण्यातही मोठा वेळ लागतो आहे. पाली बाजारपेठेला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन महामार्गालगत असल्याने तीचे स्थलांतरण तातडीने करण्याची गरज आहे. किमान ठेकेदाराने पाईपलाईन दुरुस्त होईपर्यंत त्यांच्याकडे असणार्या टॅंकरने ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा पाईपलाईन दुरुस्तीला टाळाटाळ करणार्या महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर ग्रामपंचायत ने गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे.







