खानू परिसरात बिबटयाचा सातत्याने वावर

पाली । वार्ताहर :पाली नजीकच्या खानू परिसरात मुंबई गोवा महामार्गालगत रात्रीच्या दरम्यान कुत्र्यांच्या मागावर असलेल्या बिबटयाने अंगणातील कुत्र्यांवर हल्ला करून एका कुत्र्याला नुकतेच ठार मारले होते त्यानंतर पुन्हा बिबट्या त्याच घराच्या अंगणात मध्यरात्री येऊन फिरत आहे व त्या दरम्यान माणसांची चाहूल लागल्याने तो तेथून पळून गेला.

याबाबत अधिक माहिती अशी की खानू परिसरात रात्रीच्या दरम्यान कुत्र्यांच्या मागावर असलेल्या बिबटयाने काही कुत्र्यांवर हल्ला करून त्यातील एका कुत्र्याला ठार मारले होते तर दोन कुत्र्यांना जखमी केले होते या घटनेला दोन दिवस झाल्यानंतर बिबट्या मध्यरात्रीच्या दरम्यान पुन्हा त्या घराच्या अंगणात येऊन फिरत असल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे त्यामुळे बिबट्या आता सातत्याने नागरी वस्तीकडे फिरत आहे. तसेच मागील आठवड्यात याच परिसरातील चार ते पाच कुत्रे त्याने मारलेली आहेत. बिबट्या या परिसरात मुख्य नागरी वस्तीत रात्रीच्या वेळीस सातत्याने येत आहे. हा बिबट्याचा वावर होत असलेला परिसर मुख्य नागरी वस्तीचा भाग असल्याने या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येथून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर नाणीज, कशेळी, मठ, पाली, बांबर या गावांचा जंगलमय परिसर असून येथे व मुंबई गोवा व मिऱ्या नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे साठी मागील काही वर्षामध्ये मोठी जंगलतोड झाल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीकडे सहजरीत्या येत आहेत. त्यामुळे खानू परिसरात या परिसरात फिरणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे.