MATHERAN: माथेरानमधील पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट

Significant decline in the number of tourists in Matheran

उन्हाळी हंगामात केवळ ६४४४६ पर्यटकांनी दिली भेट

माथेरान (प्रतिनिधी) : एप्रिल आणि मे हा कालावधी माथेरानचा मुख्य पर्यटन हंगाम म्हणून ओळखला जातो. परंतु या काळात माथेरानमध्ये आलेल्या पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. येथील व्यवसाय हा फक्त शनिवार रविवार वर येऊन ठेपला आहे. त्यामुळे माथेरानच्या पर्यटनासाठी ही धोक्याची घंटा आहे.

मे महिन्यामध्ये २५ तारखेपर्यंत माथेरानमध्ये ५४५६८ प्रौढ ९८७८ मुले असे ऐकून ६४४४६ पर्यटक दाखल झाले. त्यातून नगरपालिकेला २९,७५३५० इतके उत्पन्न मिळाले. ही आकडेवारी पाहता माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये निश्चितच घट झाली असल्याचे समोर आले आहे. माथेरानमध्ये होत असलेला बदल येथील पर्यटनाकरिता मारक ठरत आहे.

पारंपरिक पर्यटन मागे पडत असून अधिकाधिक नफा मिळवण्याच्या नादामध्ये व्यावसायिकांकडून पर्यटकांची फसवणूक होत आहे. पूर्वी दहा ते पंधरा दिवस राहण्याकरता अनेक कुटुंब येत होती. परंतु कालांतराने माथेरानमध्ये काही व्यवसायिकांनी प्रवेश करून येथे पर्यटनापेक्षा अर्थार्जनासाठी अधिक प्राधान्य दिले. त्यानंतर पर्यटक पाठ फिरवू लागले. पूर्वी येथे सहकुटुंब येणारे पारसी व उच्चभ्रू वर्गातील लोक आता या ठिकाणी दिसत नाहीत.