पालकमंत्री नितेश राणे साहित्य चळवळीला निश्चितच पुढे नेतील : मधु मंगेश कर्णिक

सावंतवाडी शाखा व जिल्हा शाखेतर्फे स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार

प्रकृती अस्वास्थ्यामुळे सावंतवाडीतील संमेलनाला मुकलो याचं शल्य 

सावंतवाडी । प्रतिनिधी :  सावंतवाडीत झालेल्या साहित्य संमेलनात पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी उपस्थित राहून साहित्य चळवळ पुढे नेण्यासाठी जे आश्वासन दिले आहे, ते निश्चितपणे पाळतील आणि साहित्य चळवळीला पुढे नेतील, असा विश्वास कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केला.

दरम्यान, सावंतवाडी येथे २२ मार्च रोजी संपन्न झालेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाला प्रकृती साथ न दिल्याने उपस्थित राहता आले नाही, याचे मोठे दुःख आहे. माझ्या आतापर्यंतच्या जीवनप्रवासातील हे साहित्य संमेलन माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते, असे भावोद्गार पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केले.सावंतवाडी शाखेने उत्तम नियोजन करून हे संमेलन यशस्वी केल्याबद्दल त्यांनी शाखेचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि जिल्हा शाखा व सावंतवाडी शाखेच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

जिल्हा शाखा व सावंतवाडी शाखेने या साहित्य संमेलनाचे उत्कृष्ट नियोजन केले, त्याबद्दल त्यांनी कौतुक केले. या संमेलनातून साहित्य चळवळ अधिक व्यापक होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा सावंतवाडी शाखेतर्फे आणि जिल्हा शाखेच्या वतीने स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ते प्रत्यक्ष संमेलनाला येऊ शकले नसल्याने, गेल्या आठवड्यात रत्नागिरी येथे एका कार्यक्रमादरम्यान जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा सौ. नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मधुभाई म्हणाले, सावंतवाडीत जिल्हास्तरीय साहित्य संमेलन व्हावे, ही त्यांची मनापासूनची इच्छा होती आणि त्यांनी ती बोलूनही दाखवली होती. त्यानुसार हे संमेलन २२ मार्चला सावंतवाडीत झाले. या संमेलनाला येण्याची त्यांची पूर्ण तयारी होती, परंतु अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना मुकावे लागले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि तेही सावंतवाडीत हे संमेलन होत असल्याने, ते निश्चित येणार होते आणि हे संमेलन कदाचित त्यांच्या आयुष्यातील शेवटचे संमेलन ठरले असते, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे या संमेलनाला उपस्थित राहता न आल्याचे खूप वाईट वाटत आहे, असे ते म्हणाले.