वेंगुर्ले तालुक्यातील जलजिवन मिशन योजनेचे काम मे अखेर १००% पुर्ण करा 

मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांचे बैठकीत आदेश 

वेंगुर्ले l दाजी नाईक :वेंगुर्ले तालुक्याचा जलजिवन मिशन योजनेचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी वेंगुर्ले पंचायत समितीच्या सभागृहात बैठकीद्वारे घेतला. यावेळी वेंगुर्ले तालुक्यात जलजिवन मिशन योजनेचे काम मे – २०२५ अखेर १००% पुर्ण करा असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिले आहेत.

तालुक्यात जलजिवन मिशन च्या एकुण ६० प्रस्तावामधील ११८ नळयोजना कामांपैकी ५९ योजनांचे काम पुर्ण करुन पाणी पुरवठा सुरु करण्यात आलेला आहे. ६० प्रस्तावामधील ७ योजना प्रस्तावाची कामे जागे अभावी अद्यापही सुरु नाहीत. सदरची कामे त्वरीत सुरु करणेचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी दिले. आवश्यक असलेल्या जागेचे बक्षीसपत्र त्वरीत करुन घेणेबाबत सरपंच ग्रामपंचायत यांना सुचना देणेत आल्या. तसेच गरज भासल्यास जिल्हा परिषदेचे सहकार्य घ्या अश्या सुचना त्यांनी दिल्या आहेत. जी कामे अडविली जात आहेत, अशा संबंधितांना समजावून सांगा. सांगुन एैकत नसतील तर शासकिय कामात अडथळा निर्माण करत आहेत,असे समजून संबधितांवर ३५३ खाली गुन्हा दाखल करण्याच्या सुचना ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबधित ग्रामपंचायत यांना दिल्या आहेत.

यावेळी रविंद्र खेबुडकर मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सिंधुदुर्ग, सुदेश राणे कार्यकारी अभियंता (पाणी पुरवठा), दिनेश पाटकर गटविकास अधिकारी, प्रफुल्लकुमार शिंदे उप अभियंता (पाणी पुरवठा), संबधित सरपंच, मक्तेदार, नाबार्ड कंपनी, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.