कोदवली येथील नवीन पर्यायी धरणाच्या उर्वरित कामाचा शनिवारी आ. किरण सामंत यांच्या हस्ते शुभारंभ

शासनाकडून ८ कोटी १८ लाखाचा निधी उपलब्ध

राजापूर l प्रतिनिधी : शहराला नैसर्गिक रित्या पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या खालील बाजूस सुरू असलेल्या नवीन पर्यायी धरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित कामाचा शुभारंभ शनिवारी २६ एप्रिल रोजी राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते होणार आहे. शनिवारी सायंकाळी ४ वाजता कोदवली येथील नवीन पर्यायी धरणाच्या ठिकाणी या कामाचा हा भूमिपुजन समारंभ होणार आहे.

 

राजापूर नगर परिषदेला शहरात पाणीपुरवठा करग्ण्यासाठी कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या खालील बाजुला नवीन पर्यारी धरण बांधणेस शासनाची मंजूरी आहे यासाठी प्रारंभी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र सदरचा निधी हा अपुरा पडला असून धरणाचे काम सध्या अर्धवट अवस्थेत आहे.

 

त्यामुळे धरणाच्या उर्वरित बांधकामासह अन्य कामांसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून निधीची मागणी करण्यात आली. राज्याचे उदयोगमंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला व यासाठी शासनाने वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत ८.१८ कोटी रकमेला शासन निर्णय क्र. नपावै /२०२४/प्र.क्र.२२५ (33)/नवि-दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ अन्वये मंजूरी दिली.

 

आता या नवीन पर्यायी धरणाच्या कामाला निधी उपलब्ध झाल्याने व याची निविदा प्रक्रिया पुर्ण झाल्याने आता प्रत्यक्षात या कामाला सुरूवात होणार आहे. शनिवारी आ. किरण सामंत यांच्या हस्ते या नवीन पर्यायी धरणाच्या उर्वरित कामाचा शुभारंभ केला जाणार आहे. या कार्यक्रमाला सगळयांनी उपस्थित रहावे असे आवाहन राजापूर नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.