यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम
शिरगाव ( प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील किंजवडे येथील श्री पावणादेवी मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा १ ते ३ मे या कालावधीत मोठ्या भक्तिभावाने संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर गावात आणि परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, या तीन दिवसांत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार २९ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता कलश व मूर्ती मिरवणुकीने या सोहळ्याची सुरुवात होणार आहे.यानंतर गुरुवार १ मे रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत श्री गणेश पूजन, पुण्याहवाचन, देवता आवाहन, वास्तु होम व आरती होणार आहे. दुपारी १ ते ३ महाप्रसाद व दुपारी १ ते ६ स्थानिक भजने पार पडतील. सायंकाळी ७ वाजता श्री पावणादेवीची महाआरती होईल आणि रात्री ९ वाजता बुवा प्रमोद हर्याण( श्री पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, मुंबई)व बुवा प्रमोद धुरी(प.पु.वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी प्रासादिक भजन मंडळ, मुंबई)यांच्यात पारंपरिक डबलबारी भजनांचा सामना रंगणार आहे. शुक्रवार २ मे रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत कलशारोहण, धार्मिक विधी व आरती होणार असून, दुपारी १ वाजता महाप्रसाद व स्थानिक भजने आयोजित करण्यात आली आहेत.सायंकाळी ७ वाजता श्री पावणादेवीची महाआरती, रात्री ९ वाजता जिल्हास्तरीय वारकरी दिंडीभजन स्पर्धा होईल.
शनिवार ३ मे रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत आवाहित देवतांचे पूजन, कुंकूमार्चन, श्री सत्यनारायण महापूजा पार पडेल. दुपारी १ वाजता महाप्रसाद, महिलांसाठी हळदीकुंकू व स्थानिक भजने होणार आहेत. सायंकाळी ७ वाजता महाआरतीनंतर ८ वाजता बक्षीस वितरण समारंभ व रात्री १० वाजता श्री विठ्ठलादेवी दशावतार नाट्यमंडळ, राठिवडे-सुतारवाडी यांचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.
या तीन दिवसांच्या सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन परबवाडी ऐक्यवर्धक मंडळ, किंजवडे व मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.












