प्रलंबित प्रश्नांबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथ.शिक्षक असो.पदाधिकाऱ्याबरोबर बैठक !
प्रस्तावित आंदोलन स्थगित !
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी –– शिक्षकांच्या संस्कारामुळेच आम्ही घडलो सुसंस्कारित झालो आणि या उच्च पदावर ती काम करत आहोत याचे श्रेय शिक्षकांनी केलेल्या चांगल्या संस्काराला जाते.अशा माझ्या शिक्षकांना सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या मिळणाऱ्या हक्काच्या लाभासाठी उपोषणाला बसावे लागत असेल, तर ते मी होऊ देणार नाही. मी माझ्या कारकिर्दीत सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्न तत्काळ सोडविणार.असे आश्वासन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनच्या पदाधिकारी यांना दिले.
सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सावळाराम अनावकर यांनी सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग , मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग, शिक्षणाधिकारी प्राथमिक सिंधुदुर्ग तसेच सर्व तालुका पंचायत समिती गटविकास अधिकारी आणि गटशिक्षण अधिकारी यांना २० मार्चच्या पत्राने शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबतचे निवेदन दिले होते. सदर प्रश्न सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ३० एप्रिल पर्यंत सोडवले न गेल्यास १ मे रोजी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या कार्यालयासमोर लाक्षणीय उपोषण, तर १५ मे ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन प्राप्त होताच, त्यांनी सिंधुदुर्ग सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची आपल्या दालनात नुकतीच बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या दालनात शिक्षण अधिकारी गणपती कमलकर, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे,सावंतवाडी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, कुडाळ पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी संदेश हिंजवडीकर, वेंगुर्ला तालुका पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी संतोष गोसावी, दोडमार्ग तालुका पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी मुकुंद शिनगारे,देवगड तालुका गटशिक्षण अधिकारी ,शिक्षण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक स्नेहा कांबळी, मनस्वी मुसळे, विनोद राणे, सहाय्यक लेखा अधिकारी सत्यवान सावंत, लक्ष्मण डोईफोडे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी ओरोस आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी असोसिएशन ने दिलेल्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा रवींद्र खेबुडकर यांनी केली. यामध्ये दर महिन्याच्या पाच तारीख पर्यंत निवृत्त वेतन अदा करणे, निवड श्रेणीच्या प्रस्तावातील त्रुटी पूर्ण करून शिक्षकांना लाभ मिळवून देणे, जिल्हा तसेच राज्य आदर्श शिक्षक प्राप्त पुरस्कार शिक्षकांना वेतन वाढ मंजूर करणे, गट विम्याचे प्रस्ताव तत्काळ मंजूर करणे, संगणक प्रशिक्षण पूर्ण नाही म्हणून कपात केलेली रक्कम शासनाच्या मार्गदर्शनानंतर अदा करणे, निवृत्त शिक्षकांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम मंजूर करणे, ३० जूनला निवृत्त झालेल्या शिक्षकांना १ जुलै ची काल्पनिक वेतन वाढीचे प्रस्ताव मंजूर करणे, आधी प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दळवी, नारायण सावंत, जिल्हा सचिव सुंदर पारकर, कणकवली तालुका अध्यक्ष चंद्रकांत तेली, मालवण तालुका अध्यक्ष विजय चौकीकर, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष गोसावी, देवगड तालुका अध्यक्ष मधुकर राणे, सावंतवाडी सचिव रामनाथ राऊळ, कणकवली सचिव अनिल कुमार माळवदे, वेंगुर्ला सचिव विठ्ठल कदम, विजय देसाई ,म.ल.देसाई, सविता मुननकर आधी असोसिएशनचे जिल्हा तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
*एक मे चे धरणे आंदोलन व १५ मे चे उपोषण स्थगित.* सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनने आपल्या निवेदनात दिलेल्या प्रश्नांची अपेक्षित कार्यवाही ३० एप्रिल पर्यंत न झाल्यास १ मे रोजी जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन व १५ मे रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचे ठरवले होते. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या दालनात असोसिएशनची भेट घेऊन सकारात्मक चर्चा करून सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवणार असे आश्वासन दिल्याने असोसिएशनचे नियोजित आंदोलन व उपोषण स्थगित केल्याचे जाहीर केले आहे. रवींद्र खेबुडकर यांनी असोसिएशन बरोबर सकारात्मक चर्चा करून प्राधान्याने सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्न जास्तीत जास्त लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन देऊन त्याची कारवाई करण्याचे आदेश शिक्षण अधिकारी व सर्व गटशिक्षणाधिकारी आणि वरिष्ठ लिपिक यांना दिल्याने, सदर उपोषण व धरणे आंदोलन स्थगित केल्याचे असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश भाई दळवी यांनी जाहीर केले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे तसेच शिक्षणाधिकारी व गटशिक्षण अधिकारी आणि उपस्थित वरचे लिपिक यांनी सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले…











