अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे २७ रोजी रत्नागिरी येथे अधिवेशन

चिपळूण (प्रतिनिधी):– अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे २७ रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत रत्नागिरी येथील स्वयंवर मंगल कार्यालय येथे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.

 

या अधिवेशनाचे उद्घाटन रविवार दिनांक २७ रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते होईल. यावेळी गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम प्रमुख अतिथी असणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण काटकर हे असणार आहेत. तर यावेळी आ. भास्कर, आ. शेखर निकम, आ. किरण सामंत, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष देविदास बसवदे, राज्यचिटणीस कल्याण लवांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, शिक्षणाधिकारी बी. एम. कासार आदी उपस्थित राहणार आहेत.

 

नंतर आदर्श शाळा, आदर्श शिक्षक यांच्या सन्मान होणार आहे. मान्यवरांची मनोगते होतील. दुपारी १२.३० ते १.३० वाजता संघटनात्मक व प्रशासकीय कामांविषयी मार्गदर्शन होईल. दुपारी २ .३० ते ३.३० वाजता राज्य पदाधिकारी मार्गदर्शन करतील. नंतर अध्यक्षीय भाषण व अधिवेशनाचा समारोप होईल.

 

जास्तीत जास्त शिक्षकांनी सदर अधिवेशनास उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण काटकर, उपाध्यक्ष दिलीप देवळेकर, सरचिटणीस श्री. देवघरकर यांनी केले आहे.

 

 

चौकट

 

अधिवेशनाच्या निमित्ताने काही मागण्या या संघटनेने केल्या आहेत. यामध्ये १५ मार्च २०२४ संचमान्यता शासन निर्णय रद्द करणे. शिक्षण सेवक पद रद्द करणे. जुनी पेन्शन योजना लागू करणे. कंत्राटी शिक्षकांना पुनर्नियुक्ती देणे. अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता करणे. रिक्त प्रशासकीय पदे लवकरात लवकर भरणे. MSCIT च्या कपातीसंदर्भातील शासन निर्णय रद्द करणे. या मागण्यांचा समावेश आहे.