घाणेखुंट चे सरपंच राजू ठसाळे यांची सामाजिक बांधिलकी
खेड(प्रतिनिधी)खेड तालुक्यातील ग्रामपंचायत घाणेखुंट चे सरपंच राजू ठसाळे आपल्या मानधनाचे सर्व पैसे गावातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांना विकास कामांसाठी घेऊन एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. यामुळे गावातील सर्व शाळांचे शिक्षक व ग्रामस्थ यांच्याकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.
ग्रामपंचायत घाणेखुंट व येथील सरपंच यांच्या वतीने नेहमीच आदर्शवत व नवनवीन उपक्रम राबविले जातात.सरपंच यांनी गेले २ वर्षे विविध शाश्वत विकासाच्या व पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमा हातात घेतल्या आहेत.एक वाढदिवस शाळेसाठी या उपक्रमांतर्गत जय भवानी मित्र मंडळाच्या माध्यमातून श्री राजू ठसाळे यांनी सन २००८ पासून गावातील मराठी शाळा तसेच अंगणवाडी मध्ये विविध उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे.
यावेळी सरपंच श्री राजू ठसाळे यांनी शासना कडून मिळणाऱ्या स्वतःच्या मानधना ची रक्कम स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी न वापरता ती गोळा करून सुमारे ७५ हजार- रुपये गावातील सर्व जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी यांना शैक्षणिक खर्चासाठी दिली. गेल्या वर्षीही त्यांनी मानधनाची सुमारे ३३ हजार- रुपये रक्कम गावातील दिव्यांग बांधवांना देऊन समाजाभिमुखतेचा आदर्श घालून दिला होता.यंदाही त्यांनी हा निस्वार्थ सेवाभाव जपला आहे. यावेळी त्यांनी सांगितले,“ शाळा , अंगणवाडी ह्या आपल्या समाज व्यवस्थेचा आरसा आहेत आणि तिथे शिकणारी मुले ही देशाचे उद्याचे भविष्य आहेत.त्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कायम प्रयत्नशील राहणार आहोत.“
सरपंच राजू ठसाळे यांनी गावात विविध सामाजिक संस्थाच्या मदतीने गावातील लोकांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आरोग्य शिबिर तसेच फिरता दवाखाना सुरू केला आहे. विविध दाखल्यांसाठी विद्यार्थी आणि पालकांच्या तालुक्याच्या ठिकाणी फेऱ्या होऊ नयेत म्हणून ग्रामपंचायत मध्ये दरवर्षी शिबीर आयोजित करण्यात येते.यामध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले मोफत देण्यात येतात . तसेच प्लास्टिक मुक्त गावासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहेत.त्यानंतर सरपंच राजू ठसाळे यांनी सरपंच पदासाठी शासनाकडून मिळणारे मानधन यांचाही लोकोपयोगासाठी चांगला विनियोग केला आहे . त्यांच्या या निस्वार्थी आणि अभिनव उपक्रमामुळे समाजातील सर्व स्तरांमधून त्यांचे कौतुक होत आहे.












