घटनेचा सर्वांनी आदर व वाचन करणे आवश्यक

जिल्हा न्यायाधीश श्री. पी. एस. चांदगुडे

खेड(प्रतिनिधी) खेड तालुका विधी सेवा समितीतर्फे तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश- १ डॉ. सुधीर देशपांडे यांचे मार्गदर्शनानुसार तहसिलदार कार्यालयाचे सभागृहामध्ये संविधान दिन या विषयावर माहिती शिबीर साजरे करण्यात आले. या वेळी तदर्थ जिल्हा न्यायाधीश तथा प्रभारी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती, खेड श्री. पी. एस. चांदगुडे यांनी घटनेमध्ये आपण कसे वागावे, आपले काय हक्क आहेत, शासनाची काय कर्तव्ये आहेत याचे मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. घटना काय आहे हे प्रत्येक नागरीकांनी जाणून घेतली पाहिजे तसेच घटनेचे वाचन केल्याने आपल्याला कायदयाचे ज्ञान मिळते असे सांगितले.

तसेच २रे सह दिवाणी न्यायाधीश खेड श्रीमती एम. एम. पाटील यांनी भारत देश हा संविधानाने जोडला गेलला असून प्रत्येकाने त्याचे पालन केले तर कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित नियंत्रीत होईल असे सांगितले. त्यानंतर अप्पर तहसिलदार खेड श्री कनशेट्टी यांनी प्रत्येक नागरीकांनी घटनेचा आदर करुन आचरण करावे असे सांगितले.

सदर कार्यक्रमास न्यायाधीश श्री.पी.एस.चांदगुडे, न्यायाधीश श्रीमती एम. एम. पाटील, अप्पर तहसिलदार श्री. कनशेटटी तसेच पक्षकार मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नायब तहसिलदार श्री. सिनकर, तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी श्रीमती के. एम. साळवी, श्री. एस. के. जोशी श्री एस. पी. अंधारे यांनी अधीक्षक सौ. एस. आर. रेमणे यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम
घेतले.