जामसंडे : तरवाडी येथे शेडगे बंधू भिडले

कटरने व दांड्याने हल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

देवगड : प्रतिनिधी
जामसंडे तरवाडी येथे वाटेच्या वादातून आणि आई-वडिलांना शिवीगाळ केल्याच्या कारणावरून शेडगे बंधूंमध्ये तीव्र वाद होऊन एकाने कटरने वार केले तर दुसऱ्याने दांड्याने डोके फोडल्याची घटना ७ मे रोजी सकाळी ८.३० ते ९.३० या वेळेत घडली. या प्रकरणी देवगड पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सुर्यकांत शेडगे यांची तक्रार:
जामसंडे तरवाडी येथील सुर्यकांत चंद्रकांत शेडगे (वय ३५) यांनी देवगड पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, ते ७ मे रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास त्यांच्या फॅब्रिकेशन व्यवसायासाठी लागणारे लोखंडी साहित्य घेण्यासाठी जामसंडे बाजारपेठेतील दुकानात गेले होते. साहित्य खरेदी करून टेम्पो शोधत असताना दीपक भास्कर शेडगे (रा. तरवाडी) हे त्यांच्या जवळ आले आणि “तुझे वडील मला शिवीगाळ करतात” असे म्हणून वाद घालू लागले.

त्यावेळी दीपक शेडगे यांनी त्यांच्या पँटीच्या खिशातून कटर काढून सुर्यकांत यांच्या छातीवर, गालावर, कपाळावर व डोळ्याजवळ वार केले. यानंतर त्यांनी सुर्यकांत यांना जीवे मारण्याची धमकी दिली व घटनास्थळी मोटरसायकल टाकून पळून गेले. जखमी सुर्यकांत यांना त्यांच्या वडीलांनी आणि बहिणीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, व तेथून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे हलविण्यात आले.

दीपक शेडगे यांची तक्रार:
दीपक शेडगे (वय ५९) यांनी दुसरी बाजू मांडत पोलिसांत तक्रार दिली की, सकाळी ९.३० च्या सुमारास मोटरसायकलची बॅटरी दाखवण्यासाठी गॅरेजमध्ये गेले असता सुर्यकांत यांनी त्यांना खुन्नसपणे पाहून शिवीगाळ केली व धमकी दिली. त्यानंतर त्यांनी लाकडी दांड्याने त्यांच्या डोक्यावर मारहाण केली आणि दगड उचलून मारायला धावले. त्यामुळे बचावासाठी त्यांनी कटरने सुर्यकांत यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर ते स्वतः ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेले.

या परस्परविरोधी तक्रारीवरून देवगड पोलिसांनी दोघांविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३२४(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष भालेराव करत आहेत.