रत्नागिरी ः प्रतिनिधी
हॉटसॲपवर आरटीओ ई चलनचा मेसेज पाठवून बँक खात्यातून अज्ञाताने तब्बल तीन लाख रुपये ऑनलाईन पध्दतीने लांबवले. ही घटना गुरुवार 16 एप्रिल रोजी सकाळी 10 वा.सुमारास राजापूर जवाहर चौक येथे घडली आहे.
याबाबत जमिर निझामुद्दीन खलिफे (45,रा.जवाहर चौक,राजापूर) यांनी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, 16 एप्रिल रोजी अज्ञाताने फिर्यादी जमिरचे वडिल निझामुद्दीन खलिफे यांच्या व्हॉटॲपवर आरटीओ ई चलनचा मेसेज पाठवला. हा फाईल मेसेज त्यांनी मुलगा जमिरला फॉरवर्ड केला. जमिरने त्या मेसेजच्या फाईलवर क्लिक करुन मेसेज ओपन केला असता अज्ञाताने जमिरच्या बँक खात्यातून तीन लाख रुपये ऑनलाईन पध्दतीने काढून घेत आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 318(2), माहिती तंत्रज्ञान अधिनिमय 2000 चे कलम 66(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











