जलजीवन योजनेतील ढिलाई विरोधात अनोखा निषेध
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायतीमधील जलजीवन योजनेची कामे अर्धवट अवस्थेत बंद पडल्याने गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपसरपंच हेमंत मराठे यांनी अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १५ मे २०२५ रोजी ते सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांना घागर आणि नळांच्या माळेची भेट देणार आहेत. तसेच, आपल्या सहकाऱ्यांसोबत जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठे यांनी सांगितले की, जलजीवन योजनेअंतर्गत गावात मंजूर असलेली लाखो रुपयांची कामे सध्या धूळ खात पडली आहेत. ‘हर घर जल, हर घर नल’ हे केंद्र सरकारचे ब्रीदवाक्य असले तरी, मळेवाडमधील परिस्थिती याच्या अगदी विपरीत आहे. गावात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असूनही, पंपिंग मशिनरी आणि पाईपलाईनचे काम अपूर्ण असल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे ही परिस्थिती ओढवली आहे, असा आरोप मराठे यांनी केला आहे.
या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी खेबूडकर यांना यापूर्वी लेखी निवेदन देऊनही त्यांनी कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचे मराठे यांनी सांगितले. त्यामुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांच्या वतीने आता थेट सीईओंचे लक्ष वेधण्यासाठी आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ मे रोजी होणाऱ्या या आंदोलनात गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे तरी प्रशासनाला जाग येईल आणि रखडलेली जलजीवन योजनेची कामे तातडीने पूर्ण होतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.












