नकारात्मक संगत आणि द्वेषभावनेतून व्यक्ती गुन्हेगारीकडे वळते : प्रा. राजेंद्र शिंत्रे

सावंतवाडी कारागृहात बंदीवानांसाठी सकारात्मक जिवनशैलीवर मार्गदर्शन  

सावंतवाडी । प्रतिनिधी : “कोणीही जन्मजात गुन्हेगार नसतो, केवळ नकारात्मक संगत आणि द्वेषभावनेतून व्यक्ती गुन्हेगारीकडे वळते. आपल्या मनात येणारे विचारच कृतीतून उतरतात,” असे प्रतिपादन मानसशास्त्रज्ञ प्रा. राजेंद्र शिंत्रे यांनी केले.

ते सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि सावंतवाडी जिल्हा कारागृह क्रमांक २ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘करेक्शनल सायकॉलॉजी व सकारात्मक जीवनमान’ या कार्यक्रमात बंदीवानांना मार्गदर्शन करत होते.

यावेळी सावंतवाडी जिल्हा कारागृहाचे अधीक्षक सतीश कांबळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी संदीप एकशिंगे, ॲड. खुणे, ॲड. तेंडुलकर, कारागृह हवालदार अर्जुन घोडके, संदीप शेटे, सुभेदार महादेव गवस आदी उपस्थित होते.

प्रा. शिंत्रे यांनी यावेळी डॉ. अब्राहम लिंकन आणि बराक ओबामा यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांची उदाहरणे देत बंदीवानांना सकारात्मक जीवन जगण्याचे महत्त्व पटवून सांगितले. त्यांनी विविध उदाहरणे देत जीवनातील अडचणींवर मात करत चांगले जीवन कसे जगावे याबद्दल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲड. खुणे आणि ॲड. तेंडुलकर यांनी प्रा. शिंत्रे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. वरिष्ठ तुरुंग अधिकारी संदीप एकशिंगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जिल्हा कारागृह अधीक्षक सतीश कांबळे यांनी बंदीवानांसाठी लीगल ॲड क्लिनिक आयोजित केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे आभार मानले.