पद्म पुरस्कार समितीवर  ना. नीतेश राणे यांची निवड

राज्य सरकारतर्फे सात सदस्यीय समिती स्थापन

मुंबई: प्रजासत्ताक दिनी, २६ जानेवारी २०२६ रोजी घोषित होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी योग्य नावांची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या महत्त्वपूर्ण समितीत भाजपचे नेते ना. नीतेश राणे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे मंत्री जयकुमार रावल या समितीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

या समितीत अध्यक्ष जयकुमार रावल यांच्यासह भाजपचे तीन सदस्य आहेत. यामध्ये ना. नीतेश राणे आणि आशीष शेलार यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांचे प्रत्येकी दोन सदस्य या समितीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे आणि माणिकराव कोकाटे यांचा, तर शिवसेनेकडून दादा भुसे आणि उदय सामंत यांचा समावेश समितीत करण्यात आला आहे.

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार, सरकारकडे प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांची छाननी करून केंद्र सरकारकडे पाठवण्यासाठी योग्य व्यक्तींची शिफारस ही समिती राज्य सरकारला करेल.