खेड(प्रतिनिधी)तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील विनती ऑरगॅनिक्स, अॅक्विला आणि एमआयआरसी कंपन्यांतील गोडाऊनमधून झालेल्या साहित्य चोरीप्रकरणात येथील पोलिसांनी छडा लावला असला तरी तीनही चोऱ्यांमध्ये सहभागी असलेल्या मुख्य सूत्रधारासह अन्य दोन संशयितांचा पोलिसांना अद्यापही थांगपत्ताच लागलेला नाही. पसार संशयितांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस जंगजंग पछाडत आहेत.
विनती ऑरगॅनिक्स, अॅक्विला व एमआयआरसी कंपन्यातील साहित्य चोरीप्रकरणी येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय त पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दत्तात्रय शिवाजी गोडसे, सुरज रामसिंहजीवन
चौहान, प्रतिक राजेंद्र कदम, आकाश शिवाजी भोसले यांना गजाआड केले होते. या चौघांची कसून चौकशी केल्यानंतर मुख्य सूत्रधार सचिन चव्हाण (लवेल) व अन्य दोन संशयितांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते. हे संशयित अजूनही पसारच असून पोलिसांना अद्याप त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. अटकेतील दत्ताराम गोडसे या संशयिताने न्यायालयात येथील पोलिसांबाबत केलेल्या तक्रारीनंतर एमआयआरसी साहित्य चोरीप्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी भागुजी औटी यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र तरीही अजून मुख्य सूत्रधारासह अन्य दोघा संशयितांना गजाआड करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. मुख्य सूत्रधारासह अन्य २ संशयितांच्या अटकेनंतरच अन्य कंपन्यांमधील साहित्य चोऱ्यांचाही उलगडा होण्याची शक्यता आहे.









