३९ प्रकरणे निकाली : ३४ लाखांहून अधिक रुपयांची वसुली
सावंतवाडी: सावंतवाडी येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या एकदिवसीय लोक अदालतीमध्ये एकूण ८९२ प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी ३९ प्रकरणांचा यशस्वीपणे निपटारा करण्यात आला असून, तब्बल ३४ लाख १५ हजार ६०५ रुपयांची विक्रमी वसुली झाली आहे.
या लोक अदालतीमध्ये प्रलंबित फौजदारी व दिवाणी स्वरूपाची १३७ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २७ प्रकरणांत यशस्वी मध्यस्थी होऊन १४ लाख ८९ हजार ३१२ रुपयांची वसुली करण्यात आली.
त्याचबरोबर, वादपूर्व प्रकरणे एकूण ७५५ ठेवण्यात आली होती. यापैकी १२ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, त्यातून १९ लाख २६ हजार २९३ रुपये वसूल करण्यात आले आहेत. प्रलंबित आणि वादपूर्व अशी एकूण ८९२ प्रकरणे या लोक अदालतीसमोर ठेवण्यात आली होती, त्यापैकी ३९ प्रकरणे निकाली झाली असून, एकूण ३४ लाख १५ हजार ६०५ रुपयांची रक्कम वसूल झाली आहे.
या लोक अदालतीमध्ये पॅनल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश सौ. जे.एम. मिस्त्री यांनी काम पाहिले, तर सावंतवाडी तालुका वकील बारच्या पॅनल सदस्य सौ. एन. डी. सावंत/गावडे यांनी पॅनल सदस्य म्हणून सहकार्य केले. यावेळी सावंतवाडी वकील बारचे अध्यक्ष ॲड. बी. बी. रणशुर, तसेच कार्यालयाचे सहाय्यक अधीक्षक श्री. एस. एस. पाटील, वरिष्ठ लिपीक श्री. दिवाकर सावंत, सौ. नाडकर्णी, सौ. रावराणे, सौ. कदम, सौ. ओटवणेकर, तालुका विधी सेवा समिती कडील वरिष्ठ लिपीक सौ. ए. बी. अडुळकर, कनिष्ठ लिपीक श्री. शुभम शिंदे, व चपराशी श्री. अभय चव्हाण आदी उपस्थित होते. लोक अदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी परिश्रम घेतले.









