ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूकीने श्री नवलादेवीच्या नुतन मुर्तीचे मंदिरात आगमन
मंगळवारी मुर्ती प्राणप्रतिष्ठापना तर बुधवारी कलशारोहण सोहळा
राजापूर l वार्ताहर : शहरानजीकच्या मौजे शिळ गावची ग्रामदेवता श्री नवलादेवी मातेच्या जिर्णोध्दार सोहळयाला सोमवारी शानदार प्रारंभ झाला. यामध्ये मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या श्री नवलादेवीच्या मातेच्या नवीन मुर्ती, सजविलेली पालखी, मंदिरावरील कलश व त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा यांचे राजापूर शहरातुन सवाद्य मिरवणूकीने शिळ येथील मंदीरामध्ये आगमन झाले. यावेळी आई श्री नवलादेवीच्या जयघोषांनी राजापुर शहर परिसर दुमदुमुन गेला. यावेळी मिरवणूकीत सहभागी शिळ गावातील पुरूष व महिला भाविकांनी केलेल्या पारंपारिक वेशभूषेने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात या मंदिर जिर्णोध्दार सोहळयाला प्रारंभ झाला आहे.
शहरानजीकच्या मौजे शिळ गावची ग्रामदेवता श्री नवलादेवी मातेच्या मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला आहे. यामध्ये मंदजीरात प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या श्री नवलादेवीच्या मातेच्या नवीन मुर्ती , कलश आणि सजविलेली पालखी, त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा यांची ढोल-ताशाच्या गजरामध्ये वाजत-गाजत राजापूर शहर ते शिळ अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. .
शहरानजीकच्या शिळ गावचे ग्रामदैवत व श्री नवलादेवीच्या जुन्या मंदिराचा जिर्णोध्दार करताना स्थानिक आणि मुंबईकर ग्रामस्थ तसेच समाजातील दानशुर व्यक्तिंच्या आर्थिक योगदानातून व सहकार्यातुन नव्याने आरसीसी आराखडा बनवून मंदिराची सुंदर व सुबक अशी वास्तु साकारण्यात आली आहे. निसर्ग सानिध्यात वसलेल्या या मंदिराच्या निर्माणाने परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. या जिर्णोध्दारीत मंदिराचा उद्घाटन व नूतन मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा सोमवार १२ मे ते बुधवार १४ मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. नवीन मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या ग्रामदेवतेच्या नुतन मुर्तीची सोमवारी भव्य मिरवणूकीने मंदिरात आगमन झाले.
शहरातील जवाहरचौक-बाजारपेठ ते शीळ श्री नवलादेवी मंदीर अशी नुतन मुर्ती, कलश व ग्रामदेवतेची पालखी सोबत, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा यांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीमध्ये शीळ ग्रामस्थांच्या ढोलपथकासह गोठणेदोनिवडे आणि कोदवली आगरवाडी येथील ढोलपथक सहभागी झाले होते. जवाहरचौक येथून निघालेल्या पालखी आणि ग्रामदेवतेचे ठिकठिकाणी ग्रामस्थ, गावकरी यांनी स्वागत केले.
दरम्यान, या जिर्णोद्धार सोहळा आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने मंगळवारी १३ मे मिती वैशाख कृ. प्रतिपदा रोजी सकाळी 8 वा. प्रायश्चित्य, पुण्याहवाचन, वास्तुशांती होमहवन, मंडप देवता स्थापन, पूजन जलाधिवास, धान्याधीवास, शय्यावास दुपारी 1 ते 3 वा. महाप्रसाद सायंकाळी 7 वा. संगीत भजन (बुवा केदार कदम, उपळे) सादर होणार आहे. तर सायंकाळी 8 वा. होम मिनिस्टर हा महिलांसाठी कार्यक्रम रात्रौ 9 वा. लकी ड्रॉ सोडत काढली जाणार आहे.
तर, बुधवारी १४ मे मिती वैशाख कृ. द्वितीया या दिवशी सकाळी 9 वा. प. पू. गगनगिरी महाराज मठ कोंडीवळेचे मठाधिपती प. पू. उल्हासगिरी महाराज यांचे हस्ते कळशारोहण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी 10 वा. मुख्य देवता होम हवन, सर्व देवता स्थापन व प्राणप्रतिष्ठा, पूर्णाहूती, बलिदान, महाआरती, दुपारी 2 वा. 3 वा. महाप्रसाद, दुपारी 3 वा. श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी 4 वा. हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी 6 वा. हरिपाठ भजन (वारकरी सांप्रदाय मंडळ शीळ) सायंकाळी 7 वा. देणगीदार व मान्यवरांचा सत्कार सोहळा, सायंकाळी 9 वा. पालखी सोहळा, महाआरती, महाप्रसाद तर, रात्रौ 10 वा. समर्थकृपा प्रोडक्शन प्रस्तुत कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ हे महाराष्ट्रात गाजलेले विनोदी लोकनाट्य सादर होणार आहे. तरी, भाविकांनी याप्रसंगी उपस्थीत राहुन दर्शनाचा व तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामदेवता श्री नवलादेवी मंदिर नुतनीकरण समिती ग्रामिण / मुंबई व समस्त ग्रामस्थ मौजे शिळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.












