हिंदवी स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळा उद्या झरेबांबर येथे 

दोडामार्ग l सुहास देसाई : हिंदवी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले स्मारक झरेबांबर तिठा येथे उभारले आहे. त्या स्मारकाच्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सोहळ्यास तमाम शिवशंभो पायिकानी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व तालुक्यातील शिवशंभो पायिकानी एकत्र येत झरेबांबर तिठा येथे हिंदवी स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात आले आहे. स्मारक अनावरण सोहळा तमाम शिवभक्तांच्या उपस्थितीत नुकताच मोठ्या थाटात संपन्न झाला. छत्रपती संभाजी महाराजांची जयंती सोहळा बुधवार दि. १४ मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी पहाटे किल्ले पारगड वरून शिवज्योत मोर्ले मार्गे झारेबांबर येथील स्मारकाकडे आणण्यात येणार आहे. तद्नंतर प्रथमतः शिवाज्योतिचे पूजन करून ९.०० वाजता छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. पूजन झाल्यानंतर १०.०० वाजता दोडामार्ग ते कोनाळकट्टा अशी दुचाकी व कारची भव्य रॅली काढण्यात येणारा आहे. या रॅलीची सांगता पुन्हा महाराजांच्या स्मारकाकडे येऊन होणार आहे. या रॅलीत दोडामार्ग तालुक्यातील तमाम शिवपायिकानी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

रात्री ठीक ९.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व शिवशंभो पाईक आयोजित, दुर्वांकुर प्रोडक्शन दोडामार्ग निर्मित, प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित व गणेश ठाकुर दिग्दर्शित महान अजरामर नाटक ” रायगडाला जेव्हा जाग येते ” हा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी तमाम शिवप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.