चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण-कराड मार्गांवर खेर्डी येथे दसमान कॉम्प्लेक्ससमोर डम्पर आणि दुचाकीचा बुधवारी सायंकाळी अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही महिला खेर्डी मोहल्ला येथील रहिवासी असून तिचा दफन विधी उद्या गुरुवारी सकाळी 10.30 च्या दरम्याने होणार आहे. हा डम्पर एका राजकीय नेत्याचा असल्याची चर्चा सुरु होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला समिना नासिर चिपळूणकर (वय 26) ही आपले वडिल आदमभाई अब्दुल गफूर चौगुले यांच्या सोबत दुचाकीने जात होती. हे दोघेजण खेर्डी बाजारपेठ नजीक असलेल्या दसमान कॉम्प्लेक्स समोर आले असता त्यांच्या दुचाकीला डंपरने धडक दिली. यात संबंधित महिला ही डंपरच्या चाकाखाली सापडल्याने तिला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने कामथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले










