सी. ए. होण्याचे स्वप्न करणार पूर्ण
चिपळूण (वार्ताहर) : असगणी गावच्या सरपंच सौ. संजना संजय बुरटे यांची सुकन्या खुशी बुरटे हिने तालुक्यातील मोरवंडे बोरज येथील ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वाणिज्य विभागातून इयत्ता बारावी मध्ये ९२.४० टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. श्रेया झगडे या विद्यार्थिनीने ९१.८० टक्के गुण मिळवून प्रशालेत द्वितीय आली तर आयुष उदेग हा विद्यार्थी ९० टक्के गुण मिळवून प्रशालेत तृतीय आला आहे. या सर्वांचे परिसरातून कौतुक होत आहे.
असगणी येथील माजी उपसरपंच संजय बुरटे हे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून त्यांनी आपल्या दोन्ही मुलीना उच्च शिक्षण देण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. त्यांची मोठी कन्या सध्या मिरज येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. खुशी बुरटे हिने ज्ञानदीप येथे शिक्षण घेताना दहावी मध्येही उत्तुंग यश प्राप्त केले होते. आता बारावी कॉमर्स मधूनही तिने प्रशालेत प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तिचे सी. ए. होण्याचे स्वप्न आहे. यासाठी ती खूप मेहनत घेत आहे. तिची आई सरपंच असून मुलींच्या शिक्षणाकडे त्या स्वतः लक्ष देत आहेत. खुशी ही लहानपणापासून कुशाग्र बुद्धिमत्ता असलेली मुलगी आहे. अतिशय शांत स्वभाव आणि अभ्यास करताना तो मनापासून करणे याकडे तिचा जास्त कल असतो. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे तिने सांगितले. तिच्या यशाबद्दल ज्ञानदीप हायस्कूलच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. असगणी ग्रामस्थ, कुणबी युवा चिपळूण यांच्या वतीनेही तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.












