वाचू आनंदाने उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

चिपळूण (प्रतिनिधी) : गेले सहा आठवडे नगर परिषदेच्यावतीने लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय व भोगाळेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्यावतीने वाचू आनंदाने हा उपक्रम दर रविवारी आयोजित करण्यात येत आहे. दर रविवारी निसर्गाच्या ठिकाणी सकाळी आठ ते दहा या वेळेत विद्यार्थी, नागरिक आपल्याला हवे ते पुस्तक वाचण्याचा आनंद घेतात. या रविवारी मात्र पुस्तक वाचनाबरोबरच निसर्ग वाचनाचाही अनुभवही सर्व वाचकांनी घेतला.

 

रामशेठ रेडीज यांच्या एसआर फार्म येथील मियावाकी जंगल या ठिकाणी पुस्तक वाचन व त्यानंतर निसर्ग वाचनाचा आनंद सर्वांनी लुटला. या उपक्रमासाठी चिपळूण ग्लोबल टुरिझमचेही सहकार्य लाभले.

रामशेठ रेडीज यांनी रेडीज पेट्रोल पंप येथून धामणवणेत जाण्यासाठी खास बसची व्यवस्था केली होती.

 

या बसमधून ग्रंथालयाचे कर्मचारी, नगर पालिकेचे कर्मचारी व वाचक या ठिकाणी पोहोचले. मियावाकी जंगलात बसून सर्वांनी एक तास वाचन केले. त्यानंतर निसर्ग वाचनाचा उपक्रम संपन्न झाला. रामशेठ रेडीज, विश्वास पाटील, अजित जोशी यांनी इथल्या जंगलाविषयीची माहिती दिली.

 

या वेळी मुख्याधिकारी विशाल भोसले, लेखक-साहित्यिक प्रकाश देशपांडे, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, माजी नगराध्यक्षा सावित्रीताई होमकळस, माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, अशोक भुस्कुटे, अश्विनी भुस्कुटे, सुनिल खेडेकर, प्राची जोशी, आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, शहानवाज शहा, रमा करमरकर, विलास महाडिक, कैसर देसाई आदी उपस्थित होते.

 

पुस्तक व निसर्ग वाचनानंतर चिपळूण ग्लोबल टुरिझमच्यावतीने महेंद्र कासेकर, शहानवाज शहा, प्रा. विनायक होमकळस, विश्वास पाटील आदींनी मान्यवरांचे स्वागत केले व सत्कार केला. प्रकाश देशपांडे, विशाल भोसले, बापू काणे यांनी पुस्तकांबरोबर निसर्ग वाचन किती आवश्यक आहे, हे सांगितले.

 

मुख्याधिकारी श्री. भोसले यांनी निसर्ग वाचता येईल, पण तो आधी वाचवायला हवा, अशी भावना व्यक्त केली. रामशेठ रेडीज यांनी सर्वांना धन्यवाद देत, पुन्हा पुन्हा निसर्गाशी एकरुप होत राहू, अशी भावना व्यक्त केली.

 

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास पाटील यांनी केले. लहान मुलांसह वयोवृध्दही या निसर्ग वाचनाच्या उपक्रमात सहभागी झाले होते. पुढच्या रविवारी श्री देवी करंजेश्वरी मंदिर, गोवळकोट येथे वाचू आनंदाने हा उपक्रम होणार असल्याचे सांगण्यात आले.