प्रा. डॉ.ज्ञानोबा तुकाराम कदम यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार जाहीर

चिपळूण (प्रतिनिधी) : येथील डीबीजे कॉलेजचे इतिहास विषयाचे प्राध्यापक तथा इंडियन स्टुडंट कौन्सिलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ज्ञानोबा कदम यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे. अण्णा ब्रिगेड, मुक्ता फाउंडेशन कोल्हापूर आणि दत्तगिरीजा प्रतिष्ठानच्या वतीने राज्यातील निवडक मानवंतांना या पुरस्काराने गौरविले जाते. ज्ञानोबा कदम हे विद्यार्थी दशेपासून चळवळीमध्ये सक्रिय राहिलेले आहेत.
छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे सदस्य,उदगीर शहराध्यक्ष, लातूर जिल्हा कार्यवाह जिल्हा अध्यक्ष, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संघटक ते महाराष्ट्राच्या उपाध्यक्षापर्यंत अशी विविध पदे भुषवली आहेत. गोरगरीब बहुजन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लढा उभारला, ईबीसी सवलत महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात यावी यासाठी आंदोलन, डी.एड बी.एड विद्यार्थ्यांसाठी अंतरवासिता लढा, विद्यापीठ फी वाढी विरोधी आंदोलन मोठ्या प्रमाणात छेडून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिले. राष्ट्रसेवा दलाचे लातूर जिल्हा राज्य मंडळ सदस्य ते रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष पर्यंत राष्ट्र सेवा दलामध्ये अशी महत्त्वाची पदे भूषविली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र, अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनात सक्रिय सहभाग होता. व इतर फुले, शाहू आंबेडकरी चळवळ व इतर पुरोगामी चळवळीमध्ये अग्रेसर आहेत.कदम हॆ आत्तापर्यंत राज्य स्तरावरील सहा पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.यांच्या सर्व कामगिरीचा विचार करून अण्णा ब्रिगेड व मुक्ता फाउंडेशन कोल्हापूरच्या वतीने लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरूप मानाचा कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह सन्मानपत्र व ग्रंथ असे असून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त १८ जुलै रोजी राजर्षी शाहू स्मारक कोल्हापूर येथील मिनी सभागृहात ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे, शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.रणधीर शिंदे व मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे, अशी माहिती मुक्ता फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. अमोल महापुरे कोल्हापूर यांनी दिली आहे.