निलेश जाधव / देवरूख
संगमेश्वर तालुक्यातील कर्ली येथे निधन झालेल्या वडीलांच्या अंत्यविधीसाठी मुंबईहून कारने निघालेल्या मुलगी व नातवावर काळाने घाला घातला. त्यांच्या कारचा खेडच्या जगबुडी नदीवरील पूलावर भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात मुलगी, नातू आणि इतर तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघातातून जावई बचावले आहेत. दरम्यान, कर्ली येथील मोहन काशिराम चाळके यांच्या निधनाने कर्ली गावावर शोककळा पसरली असतानाच त्यांच्या अंत्यविधीसाठी येणाऱ्या मुलीचा आणि नातवाचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या मुचरी गावावरही शोककळा पसरली आहे.
तालुक्यातील कर्ली येथील मोहन चाळके (वय-७२) यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. मोहन चाळके हे सुमारे ४० वर्षांपूर्वी शिवसेनेचे जोगेश्वरीचे शाखाप्रमुख होते. ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू होते. तसेच त्यांची कट्टर शिवसैनिक अशी ओळख होती. साधारणपणे २५ वर्षांपूर्वी ते आपल्या कर्ली गावी वास्तव्यास आले. गेले काही दिवस ते आजारी होते. यातच रविवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी त्यांची मुलगी मिताली विवेक मोरे (रा. मुचरी. ता. संगमेश्वर. सध्या रा. मिरारोड, मुंबई ) यांना देण्यात आली.
आपल्या वडीलांच्या निधनाची बातमी मिळताच त्यांच्या अंत्यविधीसाठी मुलगी मिताली विवेक मोरे, जावई विवेक श्रीराम मोरे, नातू निहार विवेक मोरे, मोहन चाळके यांची मानसकन्या मेघा परमेश पराडकर, मुलगा सौरव परमेश पराडकर, पती परमेश पराडकर व विवेक मोरे यांचा भाचा श्रेयस राजेंद्र सावंत असे सर्वजण कारने मुंबईहून कर्ली येथे येण्यास निघाले. त्यांची कार खेड येथील जगबुडी नदीवरील पूलावर आली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. व भरधाव वेगातील कार पूलाचा कठडा तोडून थेट पूलावरून खाली कोसळली. या भीषण अपघातात मिताली मोरे, निहार मोरे, मेघा पराडकर, सौरव पराडकर व श्रेयस सावंत यांचा जागीच मृत्यू झाला तर चालक परमेश पराडकर व विवेक मोरे हे बचावले आहेत. वडीलांच्या अंत्यविधीसाठी येताना मुलगी आणि नातवावर काळाने झडप घातली. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने संगमेश्वर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.











