‘जगबुडी’तून २३,०५१ घनमीटर गाळ उपसा

युद्धपातळीवर काम, नारंगी नदीतूनही ७९३५ घनमीटर गाळ उपसा, अलोरे जलसंपदासह नाम फाऊंडेशनचा सहभाग

खेड(प्रतिनिधी)शहरातील जगबुडी नदीपात्रातून अलोरें येथील जलसंपदा विभागामार्फत गाळ उपसण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत यंत्रणेने २३०५१ घनमीटर गाळ उपसा केला आहे. नाम फाऊंडेशनच्या यंत्रणेचीही नारंगी नदीपात्रात दिवस-रात्र घरघर सुरू आहे. आतापर्यंत नारंगी नदीपात्रातून ७९३५ घनमीटर गाळ उपसण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

 

पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर, नातूनगर पाटबंधारे उपविभागीय अधिकारी सत्यजीत गोसावी, कनिष्ठ अभियंता हेमंत ढवण, बळवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदा विभागाची यंत्रणा जगबुडी नदीपात्रातील गाळ

उपसण्याच्या प्रक्रियेत गुंतली आहे. सकाळपासूनच दोन पोकलेन मशिनच्या सहाय्याने गाळ उपसा करण्यात येल आहे. जगबुडी नदीपात्रातील उपसलेला गाळ तातडीने शेतकरी स्वतःहून वाहनांद्वारे उचलून आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक करत आहेत.

 

पावसाळा काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाचा शिडकावही होत

आहे. यामुळे गाळ उपसण्याच्या प्रक्रियेने कमालीची गती घेतली आहे. १६ मे पर्यंत ६२२४ ब्रास म्हणजेच १८६१४ घनमीटर गाळ उपसा करण्यात आला आतापर्यंत ८१४५ ब्रास म्हणजेच २३०५१ घनमीटर गाळ उपसण्यात यंत्रणेला यश आले.

 

नारंगी नदीपात्रातील उपसण्याच्या प्रक्रियेत नाम फाऊंडेशनची यंत्रणा गुंतली आहे. या यंत्रणेने नारंगीतून २८०४ ब्रास म्हणजेच ७९३५ घनमीटर गाळ उपसल्याने नदीपात्राची खोली वाढली आहे. पाऊस पडेपर्यंत जगबुडी नदीपात्रातून गाळ उपसण्याची प्रक्रिया सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले.