वादळी पावसाने नांदरुख गावात मोठे नुकसान

झाडे कोसळून घरांचे नुकसान : वाऱ्याने घरांचे पत्रे उडाले : वीज खांब व वीज वाहिन्या तुटून वीज पुरवठा ठप्प

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर परिसराला वादळी पावसाचा तडाखा बसला. वीजचा लखलखाट व गडगडाटासह रात्रभर संततधार पाऊस सुरु होता. यात अनेक ठिकाणी पडझडिमुळे नुकसान झाले आहे. नांदरुख गावात झाडे कोसळून घरांचे तसेच विज साहित्याचे मोठे नुकसान झाले.

नांदरुख घरटणवाडी येथील अनुप दिलीप घाडी, राजेश रमेश घाडी, श्रीमती सुहासिनी विठ्ठल परब यांच्या घराच्या छपराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच दिगंबर विठोबा घाडी व सुनील शंकर चव्हाण यांच्या घरावर फणसाचे झाडं कोसळून नुकसान झाले. दरम्यान वेगवान वाऱ्यात घाडी यांच्या घराचे पत्रे सुमारे 200 ते 300 मिटर अंतरावर जाऊन पडले होते. पटेलवाडी येथे धानाजी मधुकर चव्हाण यांच्या घराशेजारी झाडे कोसळून वीज वाहिन्या तुटून नुकसान झाले होते.

नांदरुख गावात अनेक ठिकाणी वीज खांब व वीज वाहिन्या तुटून वीज पुरवठा खंडित होता. तसेच काही मार्गांवरील झाडे पडल्याने वाहतूक ठप्प होती. प्रदीप चव्हाण व काही ग्रामस्थांनी झाडे बाजूला करून रस्ता मोकळा केला. नुकसानीची माहिती समजताच सरपंच रामचंद्र गोविंद चव्हाण यांनी पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी ग्रामविकास अधिकारी महेंद्र मोरे, नांदरुख कोतवाल स्वप्नील साळकर यासंह अन्य उपस्थित होते. दरम्यान, या नुकसानीबाबत माहिती देऊनही तहसील विभागाचे कर्मचारी पंचनाम्यासाठी न आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.