सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्ष जबाबदार असल्याचा स्थानिकांचा आरोप
तातडीने दुरुस्तीची उपसरपंच भरत गावकर यांची मागणी
न्हावेली । प्रतिनिधी : सोनुर्ली-निगुडे मार्गावरील एका मोरीची जीर्ण झालेली संरक्षक भिंत काल बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसात कोसळली. यामुळे रस्त्याला मोठा धोका निर्माण झाला असून, पावसाळ्यात रस्ता खचून वाहतूक बंद पडण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सततच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष
सोनुर्ली-निगुडे रस्त्यावर रेल्वे पुलाजवळ असलेली ही मोरी अत्यंत जीर्ण झाली होती. या मार्गावर नव्याने डांबरीकरण करत असतानाही ग्रामस्थांनी या पुलाच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते.
मात्र, त्यावेळी अधिकाऱ्यांनी हे काम बजेटमध्ये मंजुरीसाठी टाकल्याचे थातूरमातूर उत्तर दिले. त्यानंतर सोनुर्ली ग्रामपंचायतीचे उपसरपंच भरत गावकर यांनीही या पुलाच्या नव्याने बांधकामाची मागणी केली होती, परंतु त्यावेळीही केवळ वेळ मारून नेण्यात आली. अखेर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या दुर्लक्षाचा परिणाम काल झालेल्या मुसळधार पावसात दिसून आला आणि पुलाची संरक्षक भिंत कोसळली.
*रस्ता खचून वाहतूक थांबण्याची भीती*
या मोरीखालील पाण्याचा प्रवाह पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे रस्ता खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर रस्ता खचून मार्ग बंद झाला, तर सोनुर्ली आणि निगुडे गावांचा एकमेकांशी संपर्क तुटणार आहे. याशिवाय, सोनुर्ली गावातील अनेक ग्रामस्थांची शेती या पुलाच्या पलीकडे असल्याने त्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या मोरीच्या डागडुजीसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
*सार्वजनिक बांधकाम विभागाचे सोनुर्ली गावाकडे पूर्णतः दुर्लक्ष*-
उपसरपंच भरत गावकर
सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर सोनुर्ली गावाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की, “गेल्या दोन वर्षांपासून गावातील मुख्य रस्त्याचे काम करण्यात आले, परंतु या रस्त्यावरील पुलाचे काम मात्र ठेकेदाराने केले नाही. आता पावसाळा सुरू झाला असल्याने हे काम यावर्षी होणे कठीण आहे. तसेच, मुख्य रस्त्यावरील गटारेही साफ नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे.” असे त्यांनी म्हटले आहे.












