ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी रत्नागिरी पोलिसांची कडक पाऊले

नियमभंग करणाऱ्यांवर होणार कारवाई

रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यात आता ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, अनधिकृत लाऊडस्पीकर आणि जास्त आवाजाच्या लाऊडस्पीकराविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येत आहे. ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या स्थायी आदेश नुसार केली जात आहे.
अशी असेल कारवाई:
* ध्वनी मापक यंत्राचा वापर: तक्रार आल्यास, पोलीस अधिकारी ‘नॉइज लेव्हल मीटर’ने आवाजाची पातळी मोजतील. नियमांचे उल्लंघन होत असल्यास गुन्हा दाखल केला जाईल.
* नियमबाह्य स्पीकर जप्त: वैध परवानगीशिवाय वापरले जाणारे स्पीकर जप्त केले जातील. पोलीस ठाणे हद्दीतील सर्व लाऊडस्पीकरांची पुन्हा तपासणी आणि सर्वेक्षण केले जाणार आहे.
* परवानगीधारक लाऊडस्पीकर: केवळ पोलीस विभागाकडून वैध परवाना मिळालेल्या लाऊडस्पीकरनाच वापराची मुभा असेल.
* एमपीसीबीची कारवाई: ध्वनि मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारकांवर पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांच्याकडून स्वतंत्र कारवाई केली जाणार आहे.
शिक्षा आणि दंड:
* पहिल्यांदा नियम मोडल्यास इशारा दिला जाईल.
* पुन्हा उल्लंघन झाल्यास, महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३६ अंतर्गत गुन्हा दाखल होईल.
* पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार, १,००,००० रुपयांपर्यंत दंड आणि ५ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.
* या व्यतिरिक्त, पोलीस कायद्याच्या कलम १४९ नुसार वेगळी तक्रार देखील दाखल केली जाऊ शकते.
अशी आहेत आवाजाची मर्यादा (डेसिबलमध्ये):
* औद्योगिक क्षेत्र (Industrial): दिवसा ७५ डेसिबल, रात्री ७० डेसिबल.
* व्यावसायिक क्षेत्र (Commercial): दिवसा ६५ डेसिबल, रात्री ५५ डेसिबल.
* निवासी क्षेत्र (Residential): दिवसा ५५ डेसिबल, रात्री ४५ डेसिबल.
* शांतता क्षेत्र (Silence Zone): दिवसा ५० डेसिबल, रात्री ४० डेसिबल.

लाऊडस्पीकर वापरण्यासाठी वैध परवानगी मिळवण्यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलचा वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.