शालेय आठवणींना माजी विद्यार्थ्यांनी दिला उजाळा

नायशीमधील आ. बा सावंत महाविद्यालयाच्या २००५ च्या बॅचचा स्नेहमेळावा संपन्न

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील नायशीमधील ह.भ.प. आ.बा सावंत माध्यमिक विद्यालयातील २००५ च्या दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रत्यक्ष शाळेत जाऊन शालेय जीवनातील आठवणींना नवा तडका देत संपूर्ण दिवस शाळेत घालवत स्नेहमेळावा करणारी माजी विद्यार्थ्यांची ही पहिलीच बॅच ठरली.
शाळेचे शिक्षक संदीप घाग यांच्यासह संस्थेचे संचालक सूरज शिंदे, लिपिक दिनेश झगडे हे देखील या स्नेहमेळ्याव्याला उपस्थित राहिले. वैयक्तिक जीवन जगताना प्रत्येकालाच आपल्या बालपणातील मित्र मैत्रिणी आणि गुरुजन आजन्म स्मरणात राहतात. त्याच बालपणातील शालेय सहकारी आणि तत्कालीन शिक्षकांना प्रत्यक्ष भेटून जुन्या आठवणींना उजाळा देत बालपणात रमून जावं यासाठी अलीकडच्या काळात गेट टुगेदर ही संकल्पना अस्तित्वात आली आहे. यातूनच अनेक ठिकाणी अशा प्रकारे गेट टुगेदर करण्यात येतात, नायशीमधील माध्यमिक शाळेतील २००५ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी देखील याच संकल्पनेतून एकत्र येत हा स्नेहमेळावा आयोजित केला. यावेळी बॅचची वर्गप्रमुख शीतल घाग हिने उपस्थितांचे स्वागत केले. सुप्रिया झगडे यांनी प्रास्ताविक मांडत संस्थेच्या संचालकांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला हार आणि दीपप्रज्वल करून घेत स्नेहमेळावा यशस्वी केला. या मेळाव्यात सगळ्याच विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना जुन्या आठवणी ताज्या केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक संदीप घाग यांनी माजी विद्यार्थी या नात्याने शाळेमध्ये आल्याबद्दल मुलांचे कौतुक करत आभार देखील व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांनी केक कापून कार्यक्रमाचा समारोप करत दरवर्षी स्नेह मेळावा करण्याचा निर्धार केला.