राजापूर / प्रतिनिधी : दर गुरूवारी भरणाऱ्या शहरातील आठवडा बाजारावर न.प.चे नियंत्रण उरले नसल्याने पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराज पथ म्हणजे या दिवशी वाहतूक कोंडीचा दिवस बनला आहे. बंदरधक्क्यावरील मोफत पार्कंगची जागा व त्याभागातच आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांनी बसणे हा आधीचा नियम असताना आता आठवडा बाजारातील व्यापारी या रस्त्यावरून सीनेमा थिएटर असलेल्या भागापर्यत पोहोचल्याने गुरूवारी नागरिकांना या रस्त्यावरून चालणेही अवघड बनत आहे. त्यातच आठवडा बाजारादिवशी दिवसभरात एका टनाहुन अधिक प्लास्टिक कचरा निर्माण होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आठवडा बाजारात पडलेला प्लॅस्टिक कचऱ्याचा ढिग पाहिल्यावर हा आठवडा बाजार की डंपिंग ग्राऊंड असा प्रश्न पडत आहे.
दर गुरूवारी भरणाऱ्या आठवडा बाजारासाठी शेकडो व्यापारी बाहेरगावाहून येतात. सोबत त्यांची वाहने देखील असतात. शिवाय आता काही स्थानिक व्यापारी देखिल आठवडा बाजारात बसू लागले आहेत. या आठवडा बाजारासाठी नगर परिषदेने बंदर धक्का हा भाग निश्चित केलेला आहे. मात्र सद्याचे स्वरूप पाहाता अर्धी बाजारपेठ आठवडा बाजार बनत चालली आहे. गुरूवारच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पथावर दुतर्फा बसणारे व्यापारी, लगतच पार्क केलेली त्यांची अवजड वाहने, त्यामध्येच फिरणारी मोकाट गुरे अशा पध्दतीचे सद्याचे आठवडा बाजाराचे स्वरूप आहे. या बाजारात सर्रास प्लास्टिकचा वापर केला जात असल्याचे व गुरूवारच्या सायंकाळी या भागात प्लास्टीकचा प्रचंड खच पडलेला देखिल दिसून येत आहे. राजापूर नगर परिषदेने या बकाल स्थितीवर उपाय योजून शिस्तबध्द व जनतेला वावरासाठी सुकर ठरेल अशा पध्दतीने आठवडा बाजाराचे नियोजन करावे अशी मागणी नागरिकांची आहे.
आठवडा बाजारादिवशी शहरात मोठ्याप्रमाणावर शासनाने बॅन केलेल्या प्लास्टिक कचर्याचे साम्राज्य दिसुन येते . एकिकडे स्थानिक व्यापाऱ्यांवर प्लास्टिक बाळगल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारणारी नगर परिषद आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांवर मात्र मेहरबान असल्याचे दिसुन येते.












